राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?

| Updated on: Mar 30, 2025 | 11:22 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी मागणीच संजय राऊत यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.

राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यातील दोन नेत्यांना लक्ष केलं आहे. मनसेचा आज गुढीपाडव्या निमित्ताने मेळावा आहे. या मेळाव्यावरून राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचतानाच कळकळीचं आवाहनही केलं आहे. तर, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सागितलं. त्यावरून संजय राऊत यांनी अजितदादांवर हल्ला चढवला आहे. तसेच अजितदादांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीच राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यावर भाष्य केलं. राज ठाकरेंचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. हा भाजपच्या मित्रपक्षाचा मेळावा आहे. त्यांची भूमिका भाजपला धरून आहे. त्यांच्या घरी भाजपचे लोक चहापाणाला येतात. उद्याच्या महापालिका निवडणुकीत भाजपसाठी काय भूमिका घेता येईल हे ते मेळाव्यातून मांडतील, अशा शब्दात डिवचतानाच मराठी माणसाला कमजोर करणारी भूमिका राज ठाकरेंनी घेऊ नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

भाषा बदलली

अजित पवार, फडणवीस आणि शिंदे यांची निवडणुकीपूर्वीची भाषा पूर्णपणे वेगळी होती. कर्जमाफी, शेतकरी आणि लाडक्या बहिणींबाबत बोलताना करणारच असं बोलत होते. आता अजितदादांनी हातवर केले आहेत. त्यामुळे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत नसतील तर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल झाली आहे. त्याबद्दल जनतेने राजीनामा मागण्यापेक्षा अजितदादांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

शिंदेंनी उपोषणाला बसावं

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. कर्जमाफी देऊ शकत नाहीत तर त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं. त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द आहे कर्जमाफीचा, लाडक्या बहिणींचा. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या दाराबाहेर उपोषणाला बसावं, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.