वाचाळवीरांना आवरा आवरा म्हणतोय पण त्यांच्यात चढाओढच लागलीय; अजित पवार कुणावर भडकले?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकारने मुकूल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकार वैद्यनाथन यांची नेमणूक करतं असल्याची माहिती आहे.
मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी तुलना केली आहे. त्यावरून आता राज्यभर पडसाद उमटले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंगलप्रभात लोढा यांच्यावर हल्ला चढवला आहे. वाचाळवीरांना आवरा आवरा म्हणतोय, पण यांच्यात तर चढाओढच लागली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी लोढा यांच्यावर शरसंधान साधलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेजवर असतानाच ही घटना घडली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
आपण कसं वागलं पाहिजे. कसं बोललं पाहिजे यांचंही तारतम्य यांना राहिलेले नाही. या नेत्यांनी संयमाने बोललं पाहिजे. हे सर्व प्रकार महाराष्ट्र पाहतोय. निवडणुका आल्या की यांना कळेलं, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पहिल्या 7 मंत्र्यांच्या उपस्थित अधिवेशन पार पाडल होतं. आम्ही अधिवेशनात विदर्भातील प्रश्न प्रामुख्यानं मांडणार आहोत. नागपूरला 19 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलली गेली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल तेव्हा आम्ही भूमिका मांडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी पीक विमा कंपनीच्या प्रश्नावरही उत्तर दिलं. केंद्र सरकारनं याप्रकरणात ताबडतोब हस्तक्षेप करावा आणि राज्याने देखील तत्काळ कारवाई करावी. केंद्राच्या पाठिंब्यावर हे काम चालतं. त्यामुळे तात्काळ कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकारने मुकूल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकार वैद्यनाथन यांची नेमणूक करतं असल्याची माहिती आहे. मात्र, राज्य सरकारने हरिश साळवे यांची नियुक्ती करावी अशी माझी मागणी आहे, असं ते म्हणाले.
सुरेश धस यांच्यावर झालेल्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. कोर्टाने आदेश दिले आणि त्यानंतर कारवाई झाली आहे. आता पुढील कारवाई पार पडेल, असं त्यांनी सांगितलं.