अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते राजभवनात उपस्थित
काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाली. त्या बैठकीत भाजपला १४५ प्लस जागा हव्या असतील, तर अजित पवार हवेत, अशा अमित शहा यांनी सूचना दिल्या होत्या.
मुंबई : अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ हेही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राजभवनात शपथविधी सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात पोहचले. चंद्रशेखर बावनकुळे हेही राजभवनात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांपैकी ९ जण मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाली. त्या बैठकीत भाजपला १४५ प्लस जागा हव्या असतील, तर अजित पवार हवेत, अशा अमित शहा यांनी सूचना दिल्या होत्या.
या दिग्गज नेत्यांची उपस्थिती
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिंदे गट बाहेर पडला, तोच गट शिंदेंसोबत सत्तेत आला आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. रात्रीपर्यंत काही माहीत नव्हतं. आज सकाळी देवगिरीवर बैठक झाली. त्यानंतर आम्ही इकडे आलो. अमोल कोल्हे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मिटकरी म्हणतात, हे दोन उपमुख्यमंत्री व्हावेत
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं. मुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घ्यावी. असं झाल्यास महाराष्ट्राला न्याय देण्याचा जो प्रयत्न आजपर्यंत झाला नाही तो प्रयत्न होईल. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास हा महाराष्ट्र वळणावर येणार. अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास दोन उपमुख्यमंत्री होतील. एक शिंदे गटाचा आणि दुसरा भाजपचा उपमुख्यमंत्री राहावा. ही माझी भावना असल्याचंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं. मी पांडुरंगाचा यासाठी साकडं घातलं असल्याचंही त्यांनी म्हंटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्तेत जाण्याचा हा माझा एकट्याचा निर्णय नाही. बहुतेक सर्व नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. जनतेची कामं झाल्यास जनता स्वीकारेल, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आमदार
अजित पवार यांच्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सोबत होते.
मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असलेली नावे
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम आणि संजय बनसोडे यांना मंत्रीपदं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.