मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता (Ajoy Mehta) यांची महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटीचे अर्थात ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण खात्याने बुधवारी यांसदर्भातील आदेश जारी केला. गौतम चॅटर्जी हे निवृत्त झाल्यामुळे हे पद रिकामे होते. (Ajoy Mehta appointed as MahaRERA chairman)
अजोय मेहता हे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होण्यापूर्वी अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदही सांभाळले होते.
काही दिवसांपूर्वीच अजोय मेहता प्रधान सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अजोय मेहता महारेराच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग करत असल्याची माहिती समोर आली होती. मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता होती. ती अखेर खरी ठरली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मेहता यांना महारेराचे अध्यक्ष बनविण्यास विरोध केला होता. मुख्य सचिव असताना मेहता यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या नाराजीतून दोन्ही काँग्रेसचे नेते मेहता यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांची कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी विकासामध्ये जयस्वाल यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदासोबत ही नवीन जबाबदारीदेखील महाराष्ट्र राज्य शासनाने सोपविली आहे.
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान हे भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत स्मार्ट सिटी चॅलेंजसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 10 संभाव्य स्मार्ट शहरांसाठी शासन स्तरावरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येते. हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संबंधित शहरांचे मार्गदर्शक म्हणून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज पाहतात.
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्तीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाच्या विचाराधीन होता.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांचा नागरी विकासामधील दांडगा अनुभव लक्षात घेता राज्य शासनाने कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडवर श्री. जयस्वाल यांची संचालकपदी नियुक्त करुन त्यांच्याकडे अध्यक्षपदाची देखील धुरा सोपविली आहे.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराची महारेराच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग?
(Ajoy Mehta appointed as MahaRERA chairman)