Chandrakant Patil : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री, वाचा चंद्रकांत पाटलांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी मुंबईतील परळ येथील जमनादास प्रभुदास चाळ येथे झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे गिरणी कामगारांना चहा द्यायचे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून (पूर्वीचे किंग जॉर्ज हायस्कूल) त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
मुंबई : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) अखेर आज पार पडला. यात भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांचीही वर्णी लागली आहे. ते सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असून मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्यावर सोपवली जाणार आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अमित शाह यांचे संबंध चांगले आहेत. अमित शाह यांच्या पत्नीचे माहेर कोल्हापूर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक आहे. राज्य मंत्रिमंडळातही चंद्रकांत पाटलांना वरच्या क्रमांकाचे स्थान आहे. रावसाहेब दानवे, त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. आता त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. चंद्रकांत बच्चू पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी झाला. 2019पासून ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य (BJP Maharashtra) अध्यक्ष आहेत. 12 नोव्हेंबर 2019पर्यंत ते महाराष्ट्र राज्यातील महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सार्वजनिक उपक्रम वगळता कॅबिनेट मंत्री होते तसेच कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
- चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी मुंबईतील परळ येथील जमनादास प्रभुदास चाळ येथे झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे गिरणी कामगारांना चहा द्यायचे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून (पूर्वीचे किंग जॉर्ज हायस्कूल) त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 1985मध्ये फोर्टमधील सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. वयाच्या 18व्या वर्षी त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी ओळख झाली. 1980मध्ये त्यांनी एबीव्हीपीसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
- 1982मध्ये त्यांची ‘प्रदेश मंत्री’ म्हणून नियुक्ती झाली. 1985मध्ये, पाटील यांची एबीव्हीपीचे ‘क्षेत्रीय संघटन मंत्री’ म्हणून निवड झाली, जिथे त्यांनी तरुणांच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले.
- 1990मध्ये दादा पाटील एबीव्हीपीचे अखिल भारतीय मंत्री म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून लोकांना सामाजिक समस्यांची जाणीव करून दिली आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्या आणि तरुणांच्या मार्गदर्शन केले. 2004मध्ये, ते भारतीय जनता पार्टीत सामील झाले आणि 2013मध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
- जून 2014मध्ये त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर 2014मध्ये त्यांची महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. जुलै 2016पासून ते कॅबिनेट मंत्री पदावर होते. महसूल, मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हाताळत आहेत. 2019ला ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून भाजपाचे आमदार झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.