अजित पवार यांना दरवाजे बंद झालेत; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान
आधी निकाल येऊ द्या, मग बोला. सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं जाईल अशी खरी प्रक्रिया आहे. त्यामुळे यांयदर्भातला निकाल हे अध्यक्षच लावतील...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आणि राजीनामा मागे घेणं या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांना आता दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे आते ते टीका करतात, असं मोठं विधान करतानाच मुख्यमंत्री शेतात जाऊ शकत नाही का? मुख्यमंत्री काम करतात त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये, असं आवाहन संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना केलं.
सत्ता संघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. त्यावर अनेकजण कयास वर्तवत आहेत. निकालावर अंदाज वर्तवणाऱ्यांना शिरसाट यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपलं ज्ञान पाजळावं. आज सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं संजय शिरसाट म्हणाले.
अध्यक्षच निकाल लावतील
विरोधक, कायदे तज्ज्ञ जे बोलत आहेत त्यांना माझा सल्ला आहे थोडं थांबा. मग बोला. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना आपल्या पक्षासाठी बोलावं लागतं. पण आधी निकाल येऊ द्या, मग बोला. सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं जाईल अशी खरी प्रक्रिया आहे. त्यामुळे यांयदर्भातला निकाल हे अध्यक्षच लावतील, असा दावा शिरसाट यांनी केला.
अंधारे कलाकार
एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या शरद पवार यांच्यासमोर रडल्या. त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. सुषमा अंधारे या मोठ्या कलाकार आहेत. त्यांच्यावर मी बोलणार नाही. बोलू इच्छित नाही, असं ते म्हणाले.
आम्ही चोपदार
देशात एवढे पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. कारण महाविकास आघाडीचं काय झालं हे आपल्याला माहीत आहे. ते हवालदार फौजदार करत असले तरी आम्ही जनतेचे चोपदार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.