Ashish Shelar: 2017मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती, पण…; आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
भाजप आणि मनसेची युती होणार का? या प्रश्नालाही आशिष शेलार यांनी उत्तर दिलं.
मुंबई: भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीवरून मोठं विधान केलं आहे. जाणाऱ्याला एक वाट शोधणाऱ्यांना शंभर वाटा असतात. या प्रकरणाचा अर्थ एवढाच आहे की भाजपला राष्ट्रवादीसोबत (ncp) सरकार बनवण्याची ऑफर असतानाही नीती नियमाने चाललेली भाजप शिवसेनाला सोडून तीन पक्षाच्या सरकारला तयार नव्हती. ज्या शिवसेनेला (shivsena) आता राष्ट्रवादीच्या मांडीवर गुदगुल्या वाटत आहे, ती शिवसेना राष्ट्रवादी मांडीवर सोडा नखावर घ्यायला तयार नव्हती. माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात आणि निती नियम सोडल्यावर सत्तापिपासू लोकं अनैतिक सरकार कसे बनवतात हे 2019ला लोकांनी पाहिलं आहे. भाजपनेही पाहिलं आहे, असं विधान भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केलं आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं. यावेळी त्यांनी 2017मध्ये भाजपला राष्ट्रवादीसोबत युतीची ऑफर होती. पण शिवसेनेमुळे आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतलं नाही, असं शेलार यांनी सांगितलं.
खूप पाणी वाहून गेलंय. 2014ला शिवसेनेचा दारूण पराभव झाला होता. आम्ही म्हणजे महाराष्ट्र सांगणाऱ्यांना 75चा आकडाही गाठता आला नव्हता. त्यावेळचे पेपर काढा. वल्गना वाचा. सरकार बनवायचं तर बंगल्यावर या असं सांगणारे नंतर आम्हाला सत्तेत घ्या म्हणून मागे लागले होते. तिथून सर्व कहाण्या आहेत. आता बोलण्याचा संबंध नाही. काही लोकं स्वीकारतील. काही लोकं नाकारतील, असं आशिष शेलार म्हणाले.
मुंबईत भाजप स्वबळावर लढेल
भाजप आणि मनसेची युती होणार का? या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. आमच्याकडून तशी कोणतीही चर्चा नाही. त्यांच्याकडूनही कोणतीही चर्चा नाही. राज ठाकरे हे भाजपच्या काही नेत्यांचे जवळचे मित्रं आहेत. ते माझेही मित्रं आहेत. व्यक्तिगत आयुष्यात ज्यांच्याशी भेटण्यात, वेळ घालवण्यात आनंद वाटतो अशा नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीचा नेहमीच आनंद आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेलार अर्ध सत्य सांगत आहेत, खडसेंचा पलटवार
भाजप नेते आशिष शेलार यांनी 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास शिवसेनेने विरोध केला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत 2014 मध्ये भाजप शिवसेना वेगळी लढली. मात्र 2019 मध्ये मात्र भाजप-शिवसेना एकत्रित लढली होती. जर 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेकडून विरोध होता तर मग 2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. मूळात अशिष शेलार सांगताहेत ते अर्धसत्य असून 2019 मध्ये झालेल्या भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुकीत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याच वेळी जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हे ठरलं असतं तर मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे युती तुटली नसती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.