अंबादास दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं, म्हणाले,… यांच्या बळावर निस्तनाबूत करणार
आज सत्ता तुमची आहे. उद्या आमचीपण येईल.
मुंबई : ठाकरे गटांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. दानवे म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांना मस्ती आली आहे. मुंबईचा एक आमदार सुर्वे सांगतो. कोणाचेही हातपाय तोड, मी तुला जामीन देतो. हिंगोलीचा आमदार संतोष बांगर यांनी मध्यान भोजन प्रकरणी कॅमेऱ्यासमोर मारहाण केली. साधा गुन्हासुद्धा नोंद नाही. सदा सरवणकर दिवसा गोळ्या झाडतो, असं म्हणतात. बुलडाण्याचा आमदार संजय गायकवाड म्हणतो गीन गीन के मारेंगे. त्याच्यावरही कारवाई झाली नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्ता राहिली नाही, असा आरोप दानवे यांनी केला.
अंबादास दानवे म्हणाले, पोलिसांमध्ये काही हरामखोराची औलाद पैदा होत असते. नवी मुंबईचा डीसीपी शिवसेनेच्या नगरसेवकाला जर तू शिंदे गटात आला नाही तर तुझं इनकाउंटर करेन, अशी धमकी देतो. मी पोलिसांना इशारा देऊ इच्छितो. आज सत्ता तुमची आहे. उद्या आमचीपण येईल. मग, असं वागण तुम्हाला चालेल का, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
अब्दुल सत्तार याच्या मतदारसंघात ग्रामपंचायतच्या चौकात औरंगजेबाचं नाव ठेवण्याचा ठराव घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली. हिंदुत्वाच्या नावावर हे काय चाललंय, असं ते म्हणाले.
राज्य सरकारनं डाळ, तेल, साखर शंभर रुपयांत देण्याची घोषणा केली. 513 कोटी रुपयांचं टेंडर कशा पद्धतीनं निघालं. 100 रुपयांएवजी घरपोच अन्नधान्य वाटप करा. डीबीटीच्या माध्यमातून मदत करा. या टेंडरची चौकशी करा, अशी मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली.
नाशिकहून जनता आली. काही लोकं महिलांना पाहून अश्लील चाळे करत होते. शिवसेनेच्या रणरागिनींनी त्यांचं थोबाड फोडलं, असं दानवे यांनी सांगितलं.
समोरचे लोकं म्हणतात. माझ्याकडं 50 खोके आहेत. माझ्याकडं 50 आमदार आहेत. सुरत आहे. गुवाहाटी आहे. पण, माझ्याकडं उद्धव ठाकरे आहेत. या ठाकरेंच्या बळावर मी तुम्हाला निस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.