आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ, उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी

| Updated on: Jul 02, 2024 | 10:01 PM

विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महिलांची माफी मागितली. तर दानवेंना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. 

आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ, उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी
Follow us on

विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ करणाऱ्या, दानवेंचं आज अखेर 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दानवेंच्या वतीनं महिलांची माफी मागितली. कामकाज सुरु होताच. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या 5 दिवसांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यावरुन आवाजी मतदानानं ठराव पास करुन, उपसभापती निलम गोऱ्हेंनी दानवेंचं निलंबन केलं.

निलंबनाच्या ठरावावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण ही मागणी फेटाळण्यात आली. तर उद्धव ठाकरेंनी एकतर्फी निलंबनाचा ठराव अपराध असल्याचं म्हटलंय.

सभागृहात आपल्याला संधी दिली असती..तर प्रसाद लाडांची नाही तर सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली असती, असं दानवे म्हणालेत. अंबादास दानवेंवर कारवाई होणार हे दिसतंच होतं. सभागृह सुरु होण्याआधी प्रसाद लाड आधी दानवेंच्या निलंबनाची मागणी करत एकटेच पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. तर विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनीही दानवेंवर निशाणा साधला. आधी बाहेर शिव्या द्यायचे आता सभागृहात शिव्या द्यायला लागले, असं शिंदे म्हणालेत.

राहुल गांधींनी लोकसभेत भाजपवर निशाणा साधताना हिंदुत्वावरुन वक्तव्य केलं. त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. दरेकर आणि प्रसाद लाडांनी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी केली. त्यावरुन दानवे आक्रमक झाले. आणि प्रसाद लाडांना शिवीगाळ केली. आता ठाकरेंनी दानवेंच्या त्या वक्तव्यावरुन माफी मागितली, त्याचवेळी सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द काढणारे मंत्री सत्तार आणि मंत्री संजय राठोडांनाही निलंबित करणार का ? असा सवाल केला.

विधान परिषदेत दानवेंकडून जे काही घडलं. त्यावरुन 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई झाली..मात्र प्रसाद लाडांबद्दल दानवे अजूनही आक्रमकच आहेत.