पीपीई किट्स घातल्याने दहा तास उपाशी, अमित ठाकरेंकडून ‘मार्ड’च्या डॉक्टरांसाठी उच्च प्रथिनयुक्त आहाराची व्यवस्था

| Updated on: May 03, 2020 | 3:13 PM

महाराष्ट्रातील सरकारी निवासी डॉक्टरांना रुग्ण तपासणी करताना हाय प्रोटीन्सयुक्त खाद्यपदार्थ मिळावेत, याची अमित ठाकरे यांनी व्यवस्था केली (Amit Thackeray helps MARD Doctors with High Protein Food)

पीपीई किट्स घातल्याने दहा तास उपाशी, अमित ठाकरेंकडून मार्डच्या डॉक्टरांसाठी उच्च प्रथिनयुक्त आहाराची व्यवस्था
Follow us on

मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी उच्च प्रथिनं असलेली खाद्यपदार्थांची चार हजार पाकिटं ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटने’ला सुपूर्द केली. ‘कोरोना’च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टर्ससाठी अमित ठाकरेंनी मदतीचा हात दिला. (Amit Thackeray helps MARD Doctors with High Protein Food)

महाराष्ट्रातील सरकारी निवासी डॉक्टरांना रुग्ण तपासणी करताना हाय प्रोटीन्सयुक्त खाद्यपदार्थ मिळावेत, याची अमित ठाकरे यांनी व्यवस्था केली. ‘कोरोना’च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रकृतीची आबाळ होऊ नये, त्यांना पौष्टिक आणि पटकन खाता येतील असे खाद्यपदार्थ मिळावेत, या उद्देशाने त्यांनी हे खाद्यपदार्थ दिले.

‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची तपासणी करताना एकदा पीपीई किट्स घातले, की डॉक्टरांना आठ ते दहा तास काहीही खाता येत नाही. त्यामुळे यावेळी काम करत असताना डॉक्टरांना उच्च प्रथिनांची गरज असते. ही गोष्ट जेव्हा अमित ठाकरे यांना समजताच त्यांनी चार हजार प्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थाचे पॅकेट सरकारी निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध करुन दिले.

‘कृष्णकुंज’ निवासस्थानी अमित ठाकरे यांनी डॉक्टरांची नामांकित संस्था असलेल्या ‘मार्ड’चे अध्यक्ष राहुल वाघ आणि त्यांच्या टीमकडे हे पदार्थ सुपूर्द केले.

हेही वाचा : …म्हणून अमित ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक

याआधीही अमित ठाकरे यांनी सरकारी डॉक्टरांना पीपीई किट्स, मास्क, हॉस्पिटल्स बेडशिट असे साहित्य सरकारी निवासी डॉक्टरांना दिले होते. अमित ठाकरे यांच्या दिलदारपणाबद्दल पुन्हा एकदा मार्ड संघटनेने त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.