गृहिणींच्या जीवाला लागला घोर, एक लिंबू 8 रुपयांना, तर इतर भाजीपाला पण महागला
Vegetables Price : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गव्हापासून ते डाळींचे भाव गगनाला भिडलेले असताना आता भाजीपाला पण महागला आहे. एक लिंबू 8 रुपयांना मिळत आहे. तर इतर भाज्या पण कडाडल्या आहेत.
महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून महागाईने कहर केला आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. गव्हापासून ते डाळी आणि इतर अनेक वस्तूंनी उच्चांक मोडीत काढलेले आहेत. आता भाजीपाल्याने पण किचन बजेट कोलडमडले. बाजारात एक लिंबू 8 रुपयांना मिळत आहे. तर इतर भाज्या पण कडाडल्या आहेत. गॅस, पेट्रोल-डिझेलने नाकात दम आणलेला असताना भाजीपाला पण रडवत आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा शेतमालाला फटका बसला आहे. तर अनेक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. यामुळे शेतमालाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने आणि इतर कारणांमुळे दर वाढले आहेत. त्यातच उन्हाच्या झळांमुळे भाजीपाला लवकर सुकत असल्याने ग्राहक तो खरेदी करत नाही. त्याचा फटका भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.
लिंबू-काकडीचा मोठा झटका
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लहर आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यातील इतर जिल्ह्यात तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. उन्हाळ्यात लिंबांना चांगलीच मागणी आली आहे. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचा लिंबू पाण्यावर भर आहे. एका लिंबूसाठी 8 रुपये मोजावे लागत आहे. तर काकडीचा दर 50 रुपयांवरुन 80 रुपयांवर पोहचला आहे.
भाज्या कडाडल्या
मुंबईत कोथिंबीर, शेपू आणि मिरची आता 100 रुपयांच्या घरात पोहचली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या किंमतींनी सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. कोथिंबीरची एक जुडी आता 50 रुपयांना मिळते. पूर्वी हा भाव 20-25 रुपये होता. शेपू पण 25 रुपयांहू 50 रुपयांवर पोहचला आहे. 60-80 रुपयांना मिळणारी मिरची आता 100 रुपये दराने विक्री होत आहे. टोमॅटोसह वांगी, कारली आणि इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा खिसा कापल्या जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही शेतमालाची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. डाळी महागल्या, भाजीपाला महागला. त्यामुळे गृहिणींना रोजचे जेवण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.