डोंबिवली स्फोटाची अशी ही दाहकात, अंगठी आणि मंगळसूत्रावरुन पत्नीची पटवली ओळख
Dombivli Amudan Chemical Company Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपनीत स्फोट झाला. या स्फोटाने अनेक कुटुंबांना मोठा हादरा बसला. अनेकांनी त्यांच्या प्रिय व्यक्ती गमावल्या. काहींना तर त्यांची ओळख पटवणे मोठे अवघड गेले. अनेकांच्या घरावर शोककळा पसरली.
डोंबिवलीतील अनुदान केमिकल कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात अनेकांच्या घरातील कर्ता माणूस गेला. तर काहींनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला कायमचे गमावले. कर्मचाऱ्यांची ओळख पटविणे पण अत्यंत अवघड झाले होते. अंगावरील दागदागिने, कपडे यावरुन काहींची ओळख पटविण्यात आली. आजही या भागात मानवी अवशेष सापडले. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.
खानविलकर कुटुंबावर मोठा आघात
यामध्ये एक महिला कर्मचारी रिद्धी अमित खानविलकर यांचा पण मृत्यू झाला. त्यांचे पती अमित खानविलकर हे पालघरमधील एका पॅथॉलॉजीमध्ये काम करतात. तर रिद्धी अमुदानमध्ये काम करत होती. डोंबिवलीतील रामचंद्रनगरमधील नवमाऊली सोसायटीत हे कुटुंब राहत होते. या घटनेने खानविलकर कुटुंबावर मोठा आघात झाला.
घरापर्यंत आला स्फोटाचा आवाज
अमित खानविलकर यांना गुरुवारची सुट्टी होती. अमित घरीच होते. पत्नी रिद्धी कामावर गेली होती. सर्वकाही सुरळीत होते. पण नियतीला दुसरेच काही मंजूर होते. पावणेदोन वाजता अनुदान कंपनीत जोराचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज घरापर्यंत आल्याने अमित खानविलकर यांची चिंता वाढली. तोपर्यंत कोणत्या कंपनीत काय झाले हे त्यांना माहिती नव्हते. त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. कंपनीत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही क्षणातच स्फोटाची वार्ता येऊन धडकली. या स्फोटात 11 जणांनी जीव गमावला. तर 60 हून अधिक लोक जखमी झाले.
पत्नीचा घेतला शोध
अमितने तातडीने त्याच्या मित्रांना स्फोटाची माहिती दिली. सर्वांनी व्हॉट्सअपवर तिचा फोटो विविध ग्रुपवर शेअर केला. पोलिस, रुग्णालय, डॉक्टर, नर्स, इतर कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. तिचा फोटो सर्वांना पाठवला. तेव्हा एका डॉक्टरने अमितच्या मित्राला चार महिलांचे शव मिळाल्याची माहिती दिली. पण त्या पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत असल्याचे सांगितले.
अंगठी-मंगळसूत्रावरुन पटवली ओळख
शास्त्रीनगरातील रुग्णालयात अमित पोहचला. त्याने दोन महिलांचे शव पाहिले. शरीर पूर्णपणे जळाले होते. हाताच्या बोटातील अंगठी आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहताच अमितचे अवसान गळाले. तो धाय मोकलून रडू लागला. त्याच्या रडण्याने इतरांनाही हुंदके आवरणे अवघड झाले होते.