पिशवीतील दूध घेताय, सावधान! अमूल दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक
नुकतंच मुंबई नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे करण्यात आला आहे.
मुंबई : तुम्ही दररोज दूध पिता किंवा तुमच्या लहान मुलांना दूध प्यायला देता. ते शुद्ध आहे की अशुद्ध याची खात्रीही तुम्ही कधी घेता का? घेत नसाल तर सावधान! कारण नुकतंच मुंबई नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक आरोपी हे नामांकित अमूल दूध कंपनीच्या दुधात भेसळ करुन रिपॅकेजिंग करुन दूध विकत असल्याचे समोर आलं (Amul milk adulteration mumbai) आहे.
मुंबई पोलिसांनी नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गोरेगाव पोलीस ठाणे आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही लोक नामांकित कंपन्यांचा दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते दूध ग्राहकांना वितरीत करतात. अशी माहिती गुन्हे शाखा कक्षा 12 ला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेतर्फे दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांत अन्न आणि औषध प्रशासन बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या समावेश करून गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर, लिंक रोड येथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणाहून एक पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं. तर दुसऱ्या पथकाने हनुमान नगर गोरेगाव पश्चिम मुंबई येथे धाड़ टाकून दोघांना ताब्यात घेतले.
या दोन्ही पथकांना ताब्यात घेतलेल्या तीन आरोपी आणि एक महिला हे नामांकित अमूल गोल्ड, अमूल ताजा या दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापायचे. त्यानंतर त्या पिशव्यामधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून त्यात दूषित पाणी मिसळायचे. त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सील करायचे. त्या नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असे भासवून, ग्राहकांची फसवणूक करुन गैरकायदेशीर लाभ मिळवण्याच्या आशेने ग्राहकांना विक्री करण्याच्या तयारीत होते.
मात्र त्याच वेळी गुन्हे शाखा 12 क्रमांकाच्या दोन्ही टीमने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एकूण 139 लीटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले. या ठिकाणाहून दूध भेसळ करण्याकरिता लागणारे साहित्य अमूल कंपन्यांच्या बनावट पिशव्या जप्त करुन चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पुढील तपास देखील गुन्हे शाखा करत (Amul milk adulteration mumbai) आहे.