Special Report : 1 वर्ष,1 महिना 27 दिवसांनी अनिल देशमुख बाहेर, त्यानंतरच्या प्रतिक्रिया काय?
खोट्या गुन्ह्यामध्ये मला १४ महिने तुरुंगात राहावे लागले, याचं मला अतिशय दुःख असल्याचं अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आल्यानंतर म्हणाले.
मुंबई : 1 वर्ष,1 महिना 27 दिवसांनी अनिल देशमुख बाहेर बाहेर आले. मुंबईच्या आर्थररोड तुरुंगाबाहेर देशमुख यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आदेशावरून ते तुरुंगात होते. त्यांना कोर्टानं जामीन देताना विशेष निरीक्षण नोंदविलं. अजित पवार, जयंत पाटली, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते देशमुखांच्या स्वागतासाठी सज्ज होते. तुरुंगाबाहेर आल्यानंतर आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचाच विश्वास आहे.
न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. खोट्या गुन्ह्यामध्ये मला १४ महिने तुरुंगात राहावे लागले, याचं मला अतिशय दुःख असल्याचं अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आल्यानंतर म्हणाले.
अनिल देशमुख यांची मुलगी पूजा देशमुख म्हणाल्या, देवानं आम्हाला या अग्निपरीक्षेमधून काढलं अस मी म्हणू शकते. न्यादेवतेवर पूर्ण भरोसा होता आणि राहील. हाय कोर्ट, सुप्रिम कोर्टानं म्हटलं, की या खोट्या आरोपात तत्थ्य दिसत नाही.
महाविकास आघाडीच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री होते. तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानं खळबळ उडवून दिली. मुंबईतल्या बारमालकांकडून दर महिना १०० कोटी वसुली करा, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचं पत्रात म्हटलं होतं. त्याच पत्राच्या आधारे ईडीनं गुन्हा नोंदविला. ई़डी आणि सीबीआयनं दीड वर्ष या प्रकरणाचा तपास केला.
देशमुखांशी संबंधित संपत्तीवर एकूण १३० ठिकाणी छापे पडले. वेगवेगल्या अडीचशे लोकांची चौकशी झाली. त्यानंतरही दोन्ही तपास यंत्रणांना पुरेसे पुरावे मिळाले नाहीत.