मुंबईकरांसाठी महिन्याभरात दुसरी मोठी गुड न्यूज, रेल्वे राज्यमंत्र्यांचे आश्वासन

| Updated on: Mar 04, 2023 | 4:56 PM

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली.

मुंबईकरांसाठी महिन्याभरात दुसरी मोठी गुड न्यूज, रेल्वे राज्यमंत्र्यांचे आश्वासन
Raosaheb_Danve
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मुंबईकर आणि कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आलिशान आणि वेगवान वंदेभारत ( VANDEBHARAT ) लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर चालविण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी भाजप लोकप्रतिनिधी शिष्ठमंडळाला दिले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांचा फायदा होणार असून त्यांचा प्रवास सेमी हायस्पीड वंदेभारतमधून सुसाट वेगाने होणार आहे. अलीकडे सीएसएमटी ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि साई नगर – शिर्डी ( SHIRDI ) अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता मुंबईकरांना हे दुसरे गिफ्ट मिळणार आहे.

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वंदेभारत चालविण्याविषयी अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात येऊन या मुंबई ते गोवा मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या शिष्ठमंडळाला दिले आहे. कोकण शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.

कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी यावेळी आमदारांनी केली. त्यावेळी कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये   प्रविण दरेकर, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविण्याची मागणी केली.

प्रकल्पग्रस्तांना रेल्वेचे स्टॉल द्यावे

`वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी, रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी, सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रकल्पग्रस्तांना एसआरए योजनेत घरे

रेल्वेमार्गालगतच्या प्रकल्पग्रस्तांना एसआरए योजनेत घरे देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफएसआय द्यावा, कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा, वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा, आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

`मुंब्रा स्थानकाचे नाव मुंब्रादेवी करावे’

मुंब्रा स्थानकाचे नाव मुंब्रादेवी करण्याची विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी केली. त्यावर रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारडून प्रस्ताव आल्यानंतर योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.