Shivsena : आणखी एका एकनाथ शिंदे समर्थकाची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवायांचा ठपका
एकनाथ शिंदे यांचा साथ दिल्याने किरण पांडव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यास आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र किरण पांडव (Kiran Pandav) यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. किरण पांडव शिवसेनेच्या गडचिरोली समन्वयक पदावर होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरत आणि गुवाहाटीत किरण पांडव त्यांच्याबरोबर होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ते विश्वासू मानले जातात. गुवाहाटी, सुरतमध्ये किरण पांडव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा साथ दिल्याने आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यास आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या कमी होती. नंतर ती वाढत 39पर्यंत गेली.
‘जायचे त्यांनी जावे’
एकनाथ शिंदेंसोबत एक एक करत जवळपास 39 शिवसेना आमदार गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जावे, असा इशारा काठावरच्या शिवसैनिकांना दिला होता. स्थानिका पातळीवरदेखील आता दोन गट पडले असून सत्ता हवी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबाजूने जात असल्याचे दिसत आहे. केवळ आमदारच नाही, तर पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येदेखील चलबिचल पाहायला मिळत आहे. यात एकनाथ शिंदेंना सहकार्य करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
निलंबनाचा निर्णय अद्याप प्रलंबित
शिवसेनेतर्फे शिंदे गटासोबत गेलेल्या 39 आमदारांपैकी 16 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. 11 जुलैला त्याचा फैसला होणार आहे. न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला, तर त्यांची आमदारकीदेखील रद्द होऊ शकते. दरम्यान, नुकतेच एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या कारवाईनंतर भावुकही झाले होते. नंतर ही कारवाई मागे घेतल्याचे सांगण्यात आले. तर काही नेते पक्षाविरोधात उघड भूमिका घेत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.