मोठी बातमी ! माजी आमदार आशिष देशमुख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी; आता पर्याय काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
सुनील काळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्ष शिस्त मोडल्याचा चांगलाच फटका बसला आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता आशिष देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशमुख हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल 5 मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर देशमुख यांनी 9 एप्रिल रोजी उत्तर दिलं होतं. देशमुख यांच्या या उत्तरावर शिस्त पालन समितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
सहा वर्षसाठी हकालपट्टी
आपण आपल्या पक्षाविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणात लागू होतात. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षाच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच तुम्हाला सहा वर्षासाठी निष्काषित करण्यात येत असल्याचं निष्कासन आदेश पत्रात म्हटलं आहे.
पर्याय काय?
आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आता ते कुठे जाणार? असा सवाल केला जात आहे. देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. 15 दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्यासोबत नाश्ताही केला होता. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चाही झाली होती. त्यामुळे देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पण देशमुख हे मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने भेटायला आले होते, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. देशमुख यांनीही मतदारसंघाच्या कामानिमित्तानेच ही भेट घेतल्याचं म्हटलं होतं.
स्वतंत्र विदर्भाचं काय?
आशिष देशमुख हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी त्यासाठी वेळोवेळी आंदोलनही केलं होतं. भाजपही सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेत होता. मात्र, सत्ता येताच भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवला. त्यामुळे देशमुख हे भाजपमध्ये जाऊन स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा रेटणार का? असा सवालही केला जात आहे.