VIDEO: मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार यांचा टोला
माझ्यावर दबाव आहे. कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. (ashish shelar)
मुंबई: माझ्यावर दबाव आहे. कारण सर्वच आता न्यायाधीश झाले आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल, असा चिमटा आशिष शेलार यांनी काढला आहे.
आशिष शेलार हे आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बाकीचे दबाव सोडावेत. त्यांनी मुळातच न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशावर तरी काम करावे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर भाजप आंदोलन करेल. मुख्यमंत्र्यांचा इशारा आजूबाजूला बसलेल्या दोन पक्षांकडे असेल तर त्याविरोधात आम्ही लढाही देऊ. पण आमचा सवाल न्यायाधीशांनी दिलेले आदेश तरी पाळणार आहात का? हा आहे, असं शेलार म्हणाले.
तिथे निर्विकार राहू नका
अनिल देशमुख गृहमंत्री असताना कोर्टाने आदेश दिले आहेत ते पाळणार आहात का? नार्कोटिक्स प्रकरणात कोर्टाने आदेश दिले त्याविरोधात तुमचा मंत्री बोलत आहे. त्याबाबत काही भूमिका घेणार आहात का? तुमच्या बाजूला बसलेले पक्ष तुमच्यावर दबाव टाकत असेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. राज्यात आणि देशातील न्यायाधीशांचं मात्रं ऐका. तिथे मात्र निर्विकार राहू नका, असा टोला त्यांनी लगावला.
कालपर्यंत तुमचा जावई होता
आमच्याकडे तक्रारदारच फरार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव न घेता म्हटलं होतं. त्यावरूनही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले. मला वाटतं हे सुद्धा राज्य सरकारचं अपयश आहे. तुमच्या अख्त्यारीत असलेला अधिकारी होता. कालपर्यंत विविध चॅनेलवर छापेमारी टाकताना तो तुमचा जावई होता, तो आता परागंदा झाला. तुम्ही त्याला पकडू शकत नाही हे सरकारचं अपयश आहे. परमबीर सिंगांना कोर्टात हजर केलं पाहिजे. त्याला अटक का केली जात नाही हा आमचा सवाल आहे, असं ते म्हणाले.
मंत्र्यांना नागरिक शास्त्राचे पुस्तक देऊ
राज्य आणि केंद्राच्या अधिकारावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी भाजपला डिवचले आहे. त्यावरही शेलारांनी प्रतिक्रिया दिली. नागरिक शास्त्राचा अभ्यास राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना करावा लागेल. मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांबाबत बोलले असतील तर ते बरोबरच आहे. भाजप नागरिक शास्त्राचं पुस्तक सर्व मंत्र्यांना पोहोचवेल. आपल्या विधानाचं प्रत्यक्षात काही कारवाई होणार आहे का हा सवाल आहे? राज्य सरकारला अधिकार आहेत ते टिकलेच पाहिजेत हे आमचंही म्हणणं आहे. पण त्याचा वापर करा. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत करा, अधिकाराचा वापर करा, विद्यार्थ्यांना कॉलेज सुरु होण्याआधी लस टोचली पाहिजे, त्यासाठी अधिकाराचा वापर करा. चित्रकारांना लस टोचली पाहिजे त्यासाठी अधिकाराचा वापर करा, आमचं एनसीबीने कारवाई केली पाहिजे, त्यासाठी अधिकार वापरा, बलात्कार रोखण्यासाठी शक्ती कायदा व्हावा त्यासाठी अधिकार वापरा, असे सल्लेही त्यांनी दिले.
‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ हा सरकारचा नारा आहे का?
ज्याचा जावई गंजडी म्हणून पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. ‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही. यंत्रणांना काम करु द्यायचे नाही. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही… हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
“सप्टेंबरमध्ये प्रवेशपत्र दिलं, आता कंपनी म्हणे अर्जच केला नाही, आरोग्य विभागही दाद देईना”
नागपुरात भाजपकडून अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
(ashish shelar reaction on cm uddhav thackeray’s statement in aurangabad bench new building programme)