देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठे गौप्यस्फोट, पण अशोक चव्हाण यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास, म्हणाले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीवर आज 'टीव्ही 9 मराठी'च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या गौप्यस्फोटावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीवर आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला. राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार आलं होतं. तेव्हापासून पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा वारंवार चर्चेला कारण ठरत आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती होती. तसेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच सरकार स्थापनेचा प्रयत्न झाला होता, असा दावा फडणवीसांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भूमिका मांडली.
“देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो? हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. ते खूप मुरब्बी नेते आहेत. ते असं कधीही करणार नाहीत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“शरद पवार यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे. ते जी भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. त्यांचा लपूनछपून राजकारण करण्याचा स्वभाव नाही”, असंदेखील ते म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान हे निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. त्यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे”, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.
“पुण्यातील पोटनिवडणुकीच्या जागा या महाविकास आघाडीची निवडून येणार आहे. मग ते कसबा असो किंवा चिंचवड, प्रचाराला वेग आहे’, असं ते म्हणाले.
“भाजपला अशा प्रकारची रणनीती आखण्याचा दुर्दैवी प्रकार करण्याची वेळ येत आहे. यावर अजित पवार अधिक बोलू शकतील”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते.
उद्धव ठाकरेंना ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया.
राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती.
शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता.