संजय राऊत यांना मोठा धक्का, विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आजच होणार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष आजच 15 सदस्यांची समिती स्थापन करणार आहेत.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण विधिमंडळात प्रचंड वेगाने त्याबाबतच्या घडामोडी घडत आहेत. ‘विधीमंडळ नाही चोरमंडळ आहे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आजच होणार आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे 10, तर विरोधी पक्षाचे 5 सदस्य असणार आहेत.
हक्कभंग समितीचे अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता आहे. समितीकडून संजय राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या 48 तासांच उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना हे विधीमंडळ नाही चोर मंडळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षाचे आमदार आज विधानसभा आणि विधान परिषदेत आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने विधीमंडळाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडून पुन्हा असं वक्तव्य होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलीय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे मित्रपक्षाच्या नेत्यांनीदेखील राऊतांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार राऊतांवर कारवाई करण्यासाठी आग्रही आहेत.
संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत आहेत. सर्वात आधी सत्ताधारी पक्ष आता विधीमंडळातील महाविकास आघाडी सरकाच्या काळातील हक्कभंग समिती बरखास्त करणार आहे. त्यानंतर नव्याने विधीमंडळ हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळ पक्षांकडून नावे मागवली आहेत.
हक्कभंग समितीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने नावे दिली
दरम्यान, हक्कभंग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस पक्षाकडून नावे देण्यात आली आहे. या समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन राऊत, सुनिल केदार यांची नावं देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील भुसारा, दिलीप मोहिते यांच्या नावाची शिफारस करण्यात आलीय.