बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये शिजला, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. हरियाणा आणि युपीतून आलेल्या 3 शुटर्सने सिद्दीकींवर गोळीबार केला. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी तीन सूटर्सची नावे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये शिजला, अशी धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. तीनही आरोपी हरियानाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून तिघेही 2 सप्टेंबरला मुंबईत आले होते. मागच्या महिन्यात तिघेही जुहू बिचवर गेले असताना त्यांचा फोटो त्यांनी आठवण म्हणून काढल होता. यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं. आरोपींकडून 28 जिवंत काडतूसं, दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता. तर दुसरा नियमीत वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासात तिघांवरही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचा पोलिसांना संशय आहे.
4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. हरियाणा आणि युपीतून आलेल्या 3 शुटर्सने सिद्दीकींवर गोळीबार केला. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी तीन सूटर्सची नावे आहेत. गुरमैल सिंह हा हरियाणाचा, तर धर्मराज आणि शिवकुमार हे युपीतील बहराइच गंडारा गावचे रहिवासी आहेत. तीनही आरोपींना हँडल करणारा चौथा आरोपीसुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे. पंजाबच्या एका जेलमध्ये गुरमैल, धर्मराज आणि शिवकुमारची ओळख झाली. जेलमध्ये तिघेबी विश्नोई गँगच्या संपर्कात आले आणि तिथेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजला. सिद्दीकींच्या हत्येनंतर आरोपी प्रत्येकी 50 हजार वाटून घेणार होते. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचीदेखील ओळख पटली. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोपींनी हत्या कशी केली?
आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपींनी 14 हजार रुपये भाड्याने कुर्ल्यात खोली घेतली होती. आरोपी अनेक दिवसांपासून गोळी झाडण्यासाठी संधी शोधत होते. एका डिलिव्हरी बॉयच्या मदतीने आरोपींना काही दिवस आधी बंदूक पुरवण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपी गुरमैल, धर्मराज आणि शिवकुमार हे घटनास्थळी रिक्षाने पोहोचले होते. शिवकुमार गुरमैल आणि धर्मराजला मॉनिटरिंग करत होता.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपी गुरमैल आणि धर्मराज कश्यपला कालच पोलिसांनी अटक केली. सिद्दीकींची हत्या करुन पळून जाणाऱ्या आरोपींना नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली. फरार शिवकुमार आणि चौथ्या आरोपीचा 3 राज्यांमध्ये तपास सुरु आहे. मध्य प्रदेशच्या उज्जेनमध्ये मुंबई पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या टीमकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गुरमैल, धर्मराजची चौकशी सुरु आहे.