Baba Siddiqui Case : पोलीसच वाचवताय आरोपींना, झिशान सिद्दीकींचा गंभीर आरोप, काय केला गौप्यस्फोट

| Updated on: Jan 10, 2025 | 10:01 AM

Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राजकीयच नाही तर फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता. आता पोलिसांच्या तपासावरच त्यांचा मुलगा, माजी आमदार झिशान सिद्दीकी याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Baba Siddiqui Case : पोलीसच वाचवताय आरोपींना, झिशान सिद्दीकींचा गंभीर आरोप, काय केला गौप्यस्फोट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरण, झिशान सिद्दीकींचा पोलिसांवर गंभीर आरोप
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही. ही हत्या बिश्नोई गँगनेच केली की इतर कारणांमुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, हे समोर आलेले नाही. त्यातच आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांच्या तपासावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पोलीसच काही आरोपींना वाचवत असल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला आहे. राष्ट्रवादी नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली.

संशयिताची साधी चौकशी सुद्धा नाही

झिशान यांनी या तपासावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यांना तपासात त्रुटी असल्याचा आरोप केला. ज्यांच्यावर आपण यापूर्वी संशय व्यक्त केला होता. त्यांना साधं चौकशीला पण बोलावण्यात आलं नसल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलिसांनी ज्या बिल्डरवर, बांधकाम व्यावसायिकांवर संशय व्यक्त केला, त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. ज्यांचा या खूनप्रकरणाशी संबंध असू शकतो, असे मला वाटत होते, त्यांची चौकशीच झाली नसल्याचा ठपका झिशान सिद्दीकी यांनी ठेवला आहे.

हे सुद्धा वाचा

बिल्डर लॉबीला कुणाचा वरदहस्त?

चार शीट फाईल झाली आहे. आम्हाला जे लोक दोषी वाटत आहेत त्यांची चौकशी केलेली नाही यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची मजा उडवण्यात आली आहे. हा खूप गंभीर विषय आहे. मी आमचे नेते अजित पवार आणि माझ्या वडिलांचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. बिल्डर लॉबीचा यामध्ये हात आहे. पण एका पण बिल्डरची चौकशी केलेली नाही. का एका पण बिल्डरची चौकशी केली नाही? कोण बिल्डरांना वाचवत आहे? असा सवाल झिशान सिद्दीकी यांनी केला. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे ते म्हणाले.

या प्रश्नांना उत्तर कोण देणार?

पोलिसांनी अनमोल बिश्नोई हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. शुभम लोणकर आणि झिशान यांनी हत्या घडवून आणले असे सांगितले. तर ते अजून अटकेत नाहीत. मग त्यांची अटक नसताना पोलिसांनी ही थेअरी कशी मांडली?

ज्यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही. जे संशयित आहेत, त्यातील काही बांधकाम व्यावसायिक आहेत, एसआरए विकास प्रकल्पातून ही हत्या झाल्याचा दावा होत असताना त्यादृष्टीने तपास का करण्यात आला नाही.