Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी यांची हत्या होताच रोहित गोदाराचं विधान चर्चेत, सलमानबाबत काय म्हणााला होता?
Baba Siddiqui Shot Dead : शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या सलमान खान याला दहशत बसवण्यासाठी तर करण्यात आली नाही ना? या दृष्टीने तपास सुरू आहे. त्यातच आता रोहित गोदाराचं विधान पुन्हा चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मलनगरच्या कोलगेट मैदानाजवळ त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी याच्या कार्यालया बाहेर हा हल्ला करण्यात आला. सुरुवातीच्या तपासात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे फिरत आहे. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची घनिष्ठ मैत्री आहे. सलमान खान याला घाबरवण्यासाठीच ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. तर आता बिश्नोईचा खास मित्र रोहित गोदाराचं एक विधान चर्चेत आलं आहे. सलमान खानचा जो जवळचा तो आमचा शत्रू असे तो म्हणाला होता.
रोहित गोदाराचे वक्तव्य चर्चेत
गँगस्टर रोहित गोदारा याने एका वृत्त वाहिनीशी बोलताना दावा केला होता की सलमान खान आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्याचा जो कोणी मित्र असेल तो आमचा शत्रू आहे. रोहित गोदारा हा पूर्वी गोल्डी बरार गँगसाठी अगोदर काम करत होता. पण आता तो गँगस्टर लॉरेन्स विश्नोईसाठी काम करतो. तो बनावट पासपोर्ट आधारे दिल्लीहून तो दुबईला फरार झाला आहे. परदेशात राहून सुद्धा तो भारतात अनेक गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे.
कोण आहे रोहित गोदारा?
तो एक मोबाईल टेक्निशियन होता. त्यानंतर तो गँगस्टर झाला. त्याचे खरे नाव रावताराम स्वामी असे आहे. गँगस्टर झाल्यापासून त्याचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नाही. परदेशात राहून सुद्धा तो भारतात अनेक ठिकाणी गुन्हे घडवत असल्याचे समोर आले आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर त्याचे कनेक्शन समोर आले होते. आपला मुलगा गुन्हेगारी जगताच्या दलदलीत फसल्याचा दावा त्याच्या आई-वडिलांनी केला होता. तर पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष द्यावे. त्यांना चांगलं शिक्षण द्यावे. त्यांना गुन्हेगारी जगताची हवा लागू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले होते. मुलाच्या काळ्या करारनाम्यामुळे समाजात आपल्याला तोंड दाखवायला जागा उरली नसल्याचे ते एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले होते.