मैदान भरतंय, महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे, 1 लाख भाविक येणार? बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात कोणता नेता लक्ष वेधणार?

| Updated on: Mar 18, 2023 | 1:06 PM

मुंबईत मीरारोड येथे बागेश्वर बाबांचा कार्यक्रम होतोय. यात अनेक नेते आणि अभिनेते येण्याची शक्यता आहे. मुंबईतलं राजकीय वातावरण पाहता, इथे नेमका कोण नेता येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

मैदान भरतंय, महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे, 1 लाख भाविक येणार? बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात कोणता नेता लक्ष वेधणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | संत तुकोबा महाराजांचा (Tukaram) अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांचा कार्यक्रम महाराष्ट्रात (Maharashtra) कसा होतोय, याकडे आज सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत मीरारोड येथे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, अंनिस, वारकरी संप्रदाय आदी अनेक पक्ष, संस्था संघटनांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. कुणी कितीही विरोध केला तरी हिंदु धर्माचा प्रचार करणाऱ्या बागेश्वर बाबांचा कार्यक्रम होणारच असा निर्धार हिंदु संघटनांनी केला आहे. मीरारोड येथील कार्यक्रमात जवळपास १ लाख भाविक येण्याची शक्यता आयोजक आमदार गीता जैन यांनी व्यक्त केली आहे. आज सकाळपासूनच मीरा रोड येथील मंडपात राज्यभरातून शेकडो भाविक दाखल होत आहेत.

भाविकांचे जत्थे

मीरा रोड येथील कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक भाविक येत आहेत. आज आणि उद्या दोन दिवस बागेश्वर बाबा यांचा सत्संग आणि दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास १ लाख भाविक येथे येतील, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. भाविक वाढले तर त्यांना दुसऱ्या एका मैदानात शिफ्ट केलं जाईल, असंही आयोजकांनाी सांगितलं.

गंगा-जमुना सरस्वती नावाचं स्टेज

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमासाठी मोठं भलं स्टेज थाटण्यात आलंय. या स्टेजला गंगा जमुना सरस्वती असं नद्यांचं नाव देण्यात आलं आहे. कार्यक्रम स्थळी येण्यासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारं देण्यात आली आहेत.

कोणता नेता येणार?

अंधश्रद्धा पसरवणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप बागेश्वर बाबांवर केला जातो. तर महाराष्ट्रातील शिंदे सरकारदेखील अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारं आहे, असा आरोप नेहमी केला जातो. काँग्रेस-राष्ट्रवादीने बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. मात्र भाजप आणि शिंदेंची शिवसेना पक्षातील नेते या कार्यक्रमाला येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात नेमका कोणता नेता येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काही अभिनेतेदेखील या कार्यक्रमात येण्याची शक्यता आहे.