“गरज नाही ते आमच्या…” शासकीय वसाहतींबद्दलच्या ‘त्या’ निर्णयाला उद्धव ठाकरेंचा कडाडून विरोध
"मी त्यांना त्याच परिसरात दुसरी जागा दिली होती. या सर्व गोष्टींबद्दल निर्णय झाला होता. पण आता यातील काही इमारती पाडण्याचे काम सुरु झालं आहे. तुम्ही दुसरा एखादा भूखंड मागा", असे त्यांना सांगितले आहे.
Uddhav Thackeray Bandra Government Colony Rehabilitation : मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या शासकीय वसाहतीत वर्षानुवर्षे अनेक कर्मचारी राहत आहे. या शासकीय वसाहतीचा पुर्नविकास व्हावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन अशक्य आहे. त्यामुळे त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले.
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील आर.सी.एफ कर्मचारी सेनेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आर.सी.एफ कर्मचारी सेनेच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या भाषणावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी वांद्र्यातील शासकीय वसाहतीच्या पुर्नविकास मुद्द्यावर भाष्य केले.
“मी वांद्रे पूर्व या ठिकाणी राहतो, तिकडे वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची एक वसाहत आहे. मी लहानपणापासून ती पाहत आहे. या ठिकाणी सर्वच मराठी कर्मचारी राहतात. मी मुख्यमंत्री असताना एक मोठा निर्णय घेतला होता की या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घर द्यायचं. हा निर्णय आपला आहे. मी कोर्टाला दुसरीकडे जागा दिली होती. मी त्यावेळी सरन्यायधीशांना समजवून सांगितले होते. मी त्यांना त्याच परिसरात दुसरी जागा दिली होती. या सर्व गोष्टींबद्दल निर्णय झाला होता. पण आता यातील काही इमारती पाडण्याचे काम सुरु झालं आहे. तुम्ही दुसरा एखादा भुखंड मागा”, असे त्यांना सांगितले आहे.
“अदानी किंवा लोढाच्या घशात घालण्याचा डाव”
“सरकार म्हणजे मुख्यमंत्री नाही. आयुष्यभर जे काम करतात ते सरकार चालवतात. त्या कर्मचाऱ्यांची जर दुर्दशा होणार असेल, त्यांना रस्त्यावर आणून जर दुसरा भूखंड दिला जाणार. कोर्ट माझ्यावेळी दुसरीकडे जागा घ्यायला तयार होतं. अनेक मोक्याचे भूखंड हे अदानीच्या घशात टाकायचे. पण कदाचित आरसीएफदेखील अदानी किंवा लोढाच्या घशात घालण्याचा डाव आहे का? मग आम्ही जायचं कुठे”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“मी हे अजिबात होऊ देणार नाही”
वांद्रे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरे मिळालीच पाहिजे किंवा मग अदानीला दिलेल्या वांद्रे रिक्लमेशनचा भूखंडच्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना जागा द्या. आपलं सरकार घालवल्यावर त्यांनी वांद्रे कुर्ल्यातील मोक्याचा भूखंड जिथे आपण कोव्हिड सेंटर उभं केलं होतं, तो भूखंड दिल्लीच्या मालकाला भूखंड दिला. बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील भूखंड देऊन टाकला. बुलेट ट्रेनचा तुम्हाला किती उपयोग आहे, तुम्ही तिथे रोज पाफडा, शेव किंवा ढोकळा खायला जाणार आहात का? ज्याची गरज नाही ते आमच्या डोक्यावर लादताय आणि आमच्या हक्काची जी मराठी माणसं त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार, मी हे अजिबात होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.