वांद्रे टर्मिन्सवर चेंगराचेंगरी, दोघांची प्रकृती चिंताजनक, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता
वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bandra Terminus Stampede : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. वांद्रे टर्मिन्सवर सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जात होते.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5.56 वाजता वांद्रे टर्मिन्सच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झाली. वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 22921 वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही लागलेली होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. त्यात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात 2 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे बोललं जात आहे.
जखमींची नावे
शबीर अब्दुल रेहमान – पुरुष (४०) परमेश्वर सुखधर गुप्ता – पुरुष (२८) रविंद्र हरिह चुमा – पुरुष (३०) रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजामती – पुरुष (२९) संजय तिलकराम कांगय – पुरुष (२७) दिव्यांशू योगेंद्र यादव – पुरुष (१८) मोहम्मद शरीफ शेख – पुरुष (२५) इंद्रजित सहानी – पुरुष (१९) नूर मोहम्मद शेख – पुरुष (१८)
Maharashtra | Due to rush on platform number 1 of Bandra Terminus, 9 people have been injured in a stampede. Injured passengers have been shifted to a hospital: BMC
— ANI (@ANI) October 27, 2024
सध्या वांद्रे टर्मिन्समध्ये परिस्थिती नियंत्रणात
भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवाशी साधारण 18 ते 30 वयोगटातील आहेत. यातील इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनासह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ही दुर्घटना घडल्यानंतर काही काळासाठी हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. आता सध्या वांद्रे टर्मिन्समध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.
दोन जणांना गंभीर दुखापत
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वांद्रे टर्मिन्समधून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस होती. ही गाडी सकाळी ५.१५ मिनिटांनी वांद्रे टर्मिन्समधून सुटते. ही गाडी मध्यरात्री २.४४ मिनिटांनी यार्डात येते. ही गाडी वांद्रे टर्मिन्सकडे येत असताना काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, असे आम्ही पुन्हा एकदा आवाहन प्रवाशांना करत आहोत. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात गाड्या यंदा सुट्टीच्या काळासाठी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी संयमाने ट्रेनमधून प्रवास करावा, असे विनीत अभिषेक यांनी म्हटले.