उद्योगपती बी. के. बिर्ला यांचं निधन
भारतीय उद्योग जगतातील एक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. बसंत कुमार बिर्ला हे बिर्ला सेंचुरी टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीजचे चेअरमनही होते. विशेष म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी उद्योगविश्वात काम सुरु केलं होतं.
मुंबई : बिर्ला ग्रुपचे दिग्गज आणि कुमार मंगलम बिर्ला यांचे आजोबा बसंत कुमार बिर्ला यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय उद्योग जगतातील एक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. बसंत कुमार बिर्ला हे बिर्ला सेंचुरी टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीजचे चेअरमनही होते. विशेष म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी उद्योगविश्वात काम सुरु केलं होतं.
बी. के. बिर्ला यांच्या मंजुश्री खेतान आणि जयश्री मोहता या दोन मुली आहेत, ज्या अनुक्रमे केसोराम इंडस्ट्रीज आणि जयश्री टी अँड इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत. आदित्य विक्रम बिर्ला हे बीके बिर्ला यांचे एकुलते एक चिरंजीव होते. कॅन्सरमुळे 1995 मध्ये आदित्य विक्रम बिर्ला यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव कुमार मंगलम बिर्ला यांनी उद्योगाची सूत्र हाती घेतली.
Sorry to hear of the passing of veteran industrialist Shri B.K. Birla. He was a stalwart who made crucial contributions to business, education and several social causes in India. My condolences to his family and countless colleagues and associates #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) July 3, 2019
बीके बिर्ला यांचं पार्थिव कोलकात्यातील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या बिर्ला पार्कमध्ये नेण्यात येणार आहे आणि गुरुवारी तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. बीके बिर्ला यांना आजारी असल्यामुळे नातू कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईत आणलं होतं.
बीके बिर्ला यांचा जन्म 1921 मध्ये झाला. ते घनश्याम दास बिर्ला यांचे सर्वात छोटे चिरंजीव होते. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी व्यवसाय सांभाळणं सुरु केलं आणि ते लवकरच केसोराम इंडस्ट्रीजचे चेअरमनही बनले. त्यांनी कापूस, विस्कोस, पॉलिस्टर आणि नायलॉन यार्न, रिफॅक्टरी, पेपर, शिपिंग, टायरकोर्ड, ट्रान्सपरंट पेपर, स्पन पाईप, सिमेंट, चहा, कॉफी, इलायची, केमिकल्स, प्लायवूड, एमडीएफ बोर्ड यांसारख्या अनेक क्षेत्रात काम केलं आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला.
बीके बिर्ला ग्रुपमध्ये सेंचुरी टेक्सटाईल, सेंचुरी एनका आणि जयश्री टी अँड इंडस्ट्रीजसह केसोराम इंडस्ट्रीजचाही समावेश आहे. बीके बिर्ला हे कृष्णार्पन चॅरिटी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजस्थानमधील पिलानीमध्ये बीके बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाची जबाबदारी या ट्रस्टकडे आहे.