बये दार उघडं, बये दार उघडं, काय आहे शिवसेनेची मोहीम…
साडेतीन शक्तिपीठाच्या ठिकाणी जाऊन ठिकठिकाणच्या ज्योती घेऊन जाणार आहोत. बये दार उघड, असं या मोहिमेचं नाव आहे. न्यायाचं, विकासाचं, विश्वासाचं, जनतेच्या सुरक्षिततेचं दार उघड असं म्हटलं जाणार आहे.
मुंबई : नाशिकच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी राज्याच्या विकासासाठी बये दार उघडं अशी प्रार्थना केली होती. अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी मातेला साकडं घातलं जातं. असं भाविकांसारखं साकडं आम्ही घालणार आहोत. साडेतीन शक्तीपीठासमोर ज्योत घेऊन जाणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. शिवसेनेची भूमिका सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहचावी, हा या बैठकांमागचा उद्देश होता.
महिलांशी संवाद साधणार
जागेबाबत कुठं सुरक्षितता आहे. व्यवस्था आहे, हे सर्व करण्यासंदर्भात बैठका झाल्या. शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या, खासदार यांची बैठक झाली. दोन मोहिमा घेतल्या जाणार आहेत. दिवाळीनंतर महिलांशी संवाद साधला जाईल. 27 तारखेपासून बये दार उघड, अशी मोहीम सुरू होणार आहे.
ज्योती घेऊन जाणार
राज्यातील साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई आहे. तुळजापूरची तुळजाभवानी आहे. सप्तश्रृंगी माता आणि नांदेडमध्ये माहूरच्या रेणुका माता आहे. या साडेतीन शक्तिपीठाच्या ठिकाणी जाऊन ठिकठिकाणच्या ज्योती घेऊन जाणार आहोत. बये दार उघड, असं या मोहिमेचं नाव आहे. न्यायाचं, विकासाचं, विश्वासाचं, जनतेच्या सुरक्षिततेचं दार उघड असं म्हटलं जाणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासाचं दार उघडावं
ज्योती ठाकरे, संगीता चव्हाण, शर्मिला येवले अशा अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. महिलांशी संवाद साधणार आहोत. भाविकांची व्यवस्था, सुरक्षितता याची चर्चा होणार आहे. संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासासाठी दार उघडावं, यासाठी बये दार उघडं ही मोहीम हाती घेतली आहे, असंही गोऱ्हे यांनी सांगितलं.