खारघर ते बीकेसी बेस्टची नवी प्रीमियम बस सेवा, वेळापत्रक आणि भाडे जाणून घ्या
बेस्टने खारघर ते बीकेसी नवीन प्रिमियम बस सेवा सुरू केली आहे. आता बेस्ट प्रशासन लवकरच बेलापूर ते बीकेसी, बेलापूर ते अंधेरी, खारघर ते अंधेरी असे तीन नविन बस मार्ग सुरु करणार आहे.
मुंबई : बेस्ट उपक्रमाने नवीमुंबईतील कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी नवीन प्रिमियम बसेस सुरू केल्या आहेत. बेस्टने एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या या सेवेचा विस्तार करण्यात आला असून आता खारघर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स नवीन प्रिमियम बसेस सुरू करण्यात आली आहे. या बसेस अत्यंत आरामदायी आणि वातानुकूलीत आहेत. या बसेसची आसने बेस्टच्या चलो एपद्वारे आरक्षित करण्याची सोय आहे.
बेस्ट उपक्रमाने नवी मुंबईतील कार्यालयात जाणाऱ्या आणि नियमित बस प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खारघर ते बीकेसी प्रिमियम बससेवा सुरु केली आहे. खारघर ते बीकेसी बससेवेमुळे मुंबई शहराच्या विविध भागात सेवा देणाऱ्या एकूण प्रिमियम बसेसची संख्या आता 60 झाली आहे. लवकरच ती 100 पर्यंत वाढविली जाणार आहे.
बेस्टच्या या आरामदायी प्रिमियम बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रथम प्रवाशाकरीता चलो एपच्या माध्यमातून सवलत देण्यात येत आहे. ज्यात 90 रुपयांमध्ये वांद्रे ते कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत दोनवेळा प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाची प्रिमियम सेवा चलो बस म्हणून ओळखली जाते. यावर्षी एप्रिल महिन्यात ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज 7000 प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. प्रवाशांच्या वाढती मागणी पाहून बेस्टने आता नवीन बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच तीन नवे मार्ग
सर्व बसेस वातानुकुलित असून गर्दीच्या वेळी त्या कमी काळाच्या अंतराने चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा फायदा होत आहे. बेस्टच्या चलो एपच्या सहाय्याने प्रवासी आपले आसन आरक्षित करू शकतात. प्रवाशांनी जर आरक्षण केले तरच बस त्या थांब्यावर थांबणार आहे. त्यामुळे या बसला कमी थांबे असून वेगाने प्रवास करण्याची सुविधा मिळत आहे. या बसेसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे. लवकरच बेस्ट प्रशासन बेलापूर ते बीकेसी, बेलापूर ते अंधेरी, खारघर ते अंधेरी असे तीन नविन बस मार्ग सुरु करणार आहे.
खारघर ते बीकेसी
खारघर ते बीकेसीवर मार्ग क्र. एस.114 ही बस दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे. याचे कमाल भाडे 178 रुपये असणार आहे. सकाळी 7 ते रात्री 8.30 अशा एकूण सात बस धावणार आहेत.
बीकेसी ते खारघर
बीकेसी ते खारघर या मार्गावर मार्ग क्र. एस.114 ही बसे दर पंधरा मिनिटांनी धावणार असून कमाल भाडे 178 रुपये असणार आहे. सकाळी 5 ते सायं. 6.30 दरम्यान सात फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.