मुंबई : लोकलनंतर (Local) बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाई म्हणून ओळखण्यात येते. कोरोना (Corona) काळात जेव्हा लोकल सेवा ठप्प होती तेव्हा बेस्टच मुंबईकरांच्या मदतीला धावून आली. बेस्टचा प्रवास हा सर्वात सुरक्षित माणण्यात येतो. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखर व्हावा यासाठी नेहमीच बेस्टमध्ये बदल करण्यात येतात. बेस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेस्टने प्रवाशांसाठी अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. बेस्टच्या प्रीमियम (Premium) सेवेत अत्याधुनिक सेफ्टी फिचरचा समावेश करण्यात आला आहे. बेस्टच्या या सेवेमुळे महिला प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होण्यास मदत होणार आहे. बेस्टच्या या फिचरमध्ये महिला प्रवासी घरी सुखरूप पोहचेपर्यंत मागोवा घेतला जाणार आहे. तसेच बेस्टकडून आसनांचे आरक्षण करता येणारी प्रीमियम सेवा देखील सुरू करण्यात आली आहे.
या लक्झरी सेवेसाठी बेस्टने काही खास बस डिझाईन केल्या आहेत. या बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला खास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक सेफ्टी फिचरचा समावेश करण्यात आला आहे. बेस्टच्या या फिचरमध्ये महिला प्रवासी घरी सुखरूप पोहोचेपर्यंत नियंत्रण कक्षातील बेस्टचे कर्मचारी मागोवा घेणार आहेत. ज्यामध्ये बसच्या थांब्याचे ते घराचे अंतर गृहीत धरून एक संदेश संबंधित महिलेच्या मोबाईवर जाणार आहे. या संदेशाला ओके असा प्रतिसाद आला तर संबंधित महिला घरी पोहोचली असे मानण्यात येईल. जर काहीच प्रतिसाद आला नाही तर प्रवासी महिलेने दिलेल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नंबरवर कॉलसेंटवरून फोन करण्यात येणार आहे. या फोनच्या माध्यमातून महिला प्रवासी घरी पोहोचली की नाही? याची खात्री करण्यात येणार आहे.
बेस्टच्या प्रीमियम सेवेतील या अत्याधुनिक सेफ्टी फिचरचा उपयोग हा केवळ महिलांनाच नाही तर लहान मुलं आणि वृद्धांना देखील होणार आहे. यामुळे लहान मुलं आणि वृद्धांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात बेस्टची प्रीमियम सेव सुरू होणार असून त्यानंतर प्रवाशांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.