‘मी माझी 43 वर्ष काँग्रेसला दिली, आता…’, भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य
मुंबई काँग्रेसचे एकेकाळी अध्यक्ष राहिलेले बडे नेते भाई जगताप हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे मुंबई काँग्रेसमध्ये जास्त घडामोडी घडत आहेत. मुंबई काँग्रेसचे नेते लोकसभेतील मुंबईच्या दोन जागासांठी जास्त आग्रही आहेत. याआधी काँग्रेस नेते मुंबईतील तीन जागांसाठी आग्रही होते. पण उत्तर पश्चिम मुंबईची जागा ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून मुंबईतील दोन जागांवर दावा केला जातोय. विशेष म्हणजे उत्तर पश्चिम मुंबईसाठी आग्रही असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर इतकी टोकाची टीका केली की, पक्षश्रेष्ठींना निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करावी लागली. यानंतर काँग्रेस मुंबईत उरलेल्या उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागांसाठी आग्रही आहे.
विशेष म्हणजे उत्तर मुंबईसाठी ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली जात होती. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विनोद घोसाळकर यांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती. पण विनोद घोसाळकर यांनी ती ऑफर फेटाळली होती. आपण मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार, असं घोसाळकर म्हणाले होते. यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं देखील बघायला मिळालं होतं. या सर्व घडामोडींनंतर एकेकाळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले बडे नेते भाई जगताप हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला तशी प्रतिक्रिया दिली आहे.
भाई जगताप काय म्हणाले?
“महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची बैठक होती. त्यामध्ये सर्वजण होते. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. कार्यकर्त्यांनी भाजपचा खोटेपणा कसा आहे? हा सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. अनेक लोकांना देखील माहिती आहे. हे सुरू असलेलं सर्व थोतांड आहे. वर्षाताई आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की, दक्षिण मध्यची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आली पाहिजे. दक्षिण मध्यतून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे”, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. यावेळी भाई जगता यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “मोदी की गॅरंटी हा स्लोगन आणलाय ना, तोच स्लोगन मोदींना घेऊन डुबणार आहे”, अशी देखील टीका भाई जगातप यांनी केली.
‘माझी 43 वर्ष मी काँग्रेस पक्षासाठी दिली’
“उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन्ही आमच्या सीट आहेत. पाचव्या सत्रात या निवडणुका आहेत. त्यासाठी आणखी वेळ आहे. चार-पाच दिवसात याचाही निकाल होईल. त्या जागेसाठी मी आग्रही आहे. कारण मी स्वतः वांद्रेमध्ये राहतो. इतर सहकाऱ्यांनी सुद्धा ही सीट मागितलेली आहे. उत्तर मध्य जागेसाठी मी प्रचंड आग्रही आहे. माझी 43 वर्ष मी काँग्रेस पक्षासाठी दिली आहेत. मी प्रयत्न करत आहे म्हणून दुसऱ्या कोणाला तिकीट मिळू नये असं देखील माझं म्हणणं नाही”, असं भाई जगताप म्हणाले. “दक्षिण मध्यची जागा देखील आम्ही मागण्याचा प्रयत्न केला. एकनाथराव गायकवाड स्वतः इथून खासदार होऊन आले होते. चर्चा झाली. निर्णय झाला. त्यानंतर आम्ही स्वतः सर्वजण आता कामाला लागलो”, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली.