राज्याच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार?, भरत गोगावले म्हणतात, आम्ही कॉलची वाट पाहतोय
कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू, असं भरत गोगावले यांनी म्हंटलं. ७ मंत्री पदे आम्हाला आणि ७ भाजपाला मिळणार आहेत.
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार असं विचारलं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रिपदही मिळालीत. पण, शिंदे गटातील आमदार मंत्रीपदासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले म्हणाले, कॅबिनेट विस्तार एक ते दोन दिवसांमध्ये होईल असे सांगितले. त्यामुळे आम्ही तयारीमध्ये बसलो आहोत. कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू, असं भरत गोगावले यांनी म्हंटलं. ७ मंत्री पदे आम्हाला आणि ७ भाजपाला मिळणार आहेत. फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्यूला ठरला आहे. त्या पद्धतीने हा विस्तार होईल. राष्ट्रवादी काँग्रेसवर कुठलीही नाराजी आहे, असं आम्हाला सध्या वाटत नाही. लवकरच आम्ही त्यांच्यासोबतही जुळवून घेऊ असा आम्हाला विश्वास असल्याचंही भरत गोगावले यांनी म्हंटलं.
मुख्यमंत्री शब्द पाळतील असा विश्वास
पालकमंत्री झाल्याशिवाय रायगडचा विकास होणार नाही. आम्ही तिथे पाच आमदार आहोत. त्यामुळे पालकमंत्रीपद रायगडला मिळणं आणि तेदेखील मला मिळणं हे अत्यंत गरजेचे आहे. मला मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलाय. ते शब्द पाळतील असा मला विश्वास असल्याचंही भरत गोगावले यांनी सांगितलं.
संजय राऊत तारीख पे तारीख देतात
संजय राऊत जे बोलतात त्याचे नेमकं उलट होतं. दरवेळी ते काय ना काय बोलत राहतात. तारीख वर तारीख देत राहतात. आता एक वर्ष सरकारला झालेलं आहे. सरकार काय पडले नाही. ते वारंवार तारीख देत राहिले. आमचे सरकार चालत राहिले. त्यामुळे त्यांनी बोलत राहावं जेणेकरून त्याच्या सगळ्या विपरीत होईल आणि सरकार सुरूच राहील, असा टोलाही भरत गोगावले यांनी लगावला.
या दोन नेत्यांच्या राजकारणात मोठा फरक
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेला वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणात जमीन आसमानचा फरक आहे. साहेबांनी माँ साहेबांना कधी राजकारणात आणलं नाही. त्या पडद्यामागे राहून आमच्यावर नेहमी मुलाप्रमाणे प्रेम करत होत्या. पण तसं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झालं नाही. हाच मोठा फरक आहे. शितावरून भाताची ओळख होते. एवढेच मी सांगतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र, समजने वाले को इशारा काफी है…