मुंबईः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उद्या महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. त्यानंतर आता राहुल गांधी मध्यप्रदेशाआधी गुजरातला जाणार आहेत. त्यामुळे ज्या विधानामुळे महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा गाजली होती, त्याचा राजकीय नफा-नुकसान की होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यानंतर काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पोहोचली.
त्याआधीच्या पाचही राज्यातून भारत जोडो यात्रेत मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी गर्दी झाली होती. मात्र राजकीय मुद्यांवरुन राहुल गांधींचा महाराष्ट्र दौराच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. त्याला कारण ठरलं आहे विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलचं विधान.
राहुल गांधींनी सावरकरांचा माफीनामा वाचून दाखवल्यामुळे मोठा वाद रंगला. आणि त्या पुढे जात हे सगळं प्रकरण नेहरू गांधींपर्यंत गेले. त्यामुळेही महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटही सहभागी झाला होता.
अडीच वर्षांपूर्वी या तिन्ही पक्षांनीच भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडी सरकारने आपली सत्ता आणली होती. मात्र सावरकरांच्या विधानावरुन राष्ट्रवादीनं सावरकरांबद्दल थेट भूमिका मांडली नाही पण शिवसेनेनं मात्र थेट मविआ धोक्यात येण्याचाच इशारा दिला.
राहुल गांधींनी सावरकरांवबद्दल केलेल्या विधानाच्या टायमिंगचीही चर्चा राज्यात जोरदार झाली. कारण आधी एक दिव आदित्य ठाकरे यांनी भारत जोडोत सहभाग घेतला होता.
त्यांनी राहुल गांधींना मिठीही मारली, त्या गोष्टीची जोरदार चर्चाही झाली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाची कोंडी झाल्याचे दिसून आले.
भारत जोडो यात्रेची दुसरी बाजू म्हणजे याआधीच्या पाच राज्याहून महाराष्ट्रातील राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सर्वाधिक चर्चेत राहिली. मात्र सावरकरांच्या विधानावरुन पूर्ण ३ दिवस राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता त्यांच्या या विधानाचा फायदा होईल की तोटा हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या भारत जोडोच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. गुजरातच्या निवडणुका तोंडावर असताना राहुल गांधींनी गुजरातमध्ये भारत जोडो यात्रा का नेली नाही असाही सवालही उपस्थित करण्यात आले नाही.
याआधी राहुल गांधी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, तिथून राजस्थान, पुढे उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरसाठी नियोजीत होती. या टप्प्यात गुजरातचा समावेश नव्हता.
मात्र आता 20 नोव्हेंबरला राहुल गांधी मध्य प्रदेशात पोहोचल्यानंतर 21 आणि 22 नोव्हेंबरला गुजरातला जाणार आहेत.
गुजरातमध्ये भारत यात्रा काढली जाईल की मग राहुल गांधी प्रचारसभा घेतील, हे अद्याप अस्पष्ट आहे.
गुजरातमध्ये दोन दिवसांच्या सभांनंतर राहुल गांधी 23 नोव्हेंबरला पुन्हा मध्यप्रदेशात येऊन वेळापत्रकानुसार भारत जोडोत
चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे.