भास्कर जाधव यांची शंभूराज देसाई यांच्यावर टीका, म्हणाले, कर्नाटक सीमावाद प्रश्नावर शंभू देसाईंचा…
सकाळ-संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभू देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला आहे, असाही जाधव यांनी समाचार घेतला.
मुंबई : मंत्री शंभूराज देसाई कर्नाटकला जाणार होते. मात्र, त्यांचा चंबू झाला. असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय. शंभूराज देसाई यांच्यावर भास्कर जाधव यांनी हा हल्लाबोल केलाय. तर, भास्कर जाधव यांना फार महत्त्व देत नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हंटलं. भास्कर जाधव यांच्या टीकेला शंभूराज देसाई यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. भास्कर जाधव म्हणाले, राज्यातल्या मंत्र्यांच्या तोंडाला लॉक लागलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज शाब्दिक हल्ला करत आहेत. महाराष्ट्रावर आणि सीमावर्ती भागातील लोकांवर सकाळ-संध्याकाळ अन्याय करतात. मात्र, यासंदर्भात महाराष्ट्रातलं सरकार तोंड उघडत नाही.
राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांनी राणाभीमदेवीच्या थाटात सांगितलं. आम्ही कर्नाटकला जाणार. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला. चंद्रकांत पाटीलसारखा मजबूत मंत्री आणि एक चंबू देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. सकाळ-संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभू देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला आहे, असाही जाधव यांनी समाचार घेतला.
यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, सभागृहात बोलण्यासारखं काही नाही. बाहेर जाऊन बोलायचं. सरकारची बाजू मांडणाऱ्या मंत्र्यांवर टीका करायची. आमची काही संस्कृती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला काही सूचना दिल्यात. कोणत्या पद्धतीनं काम करायचं. ठीक आहे, ते बोलत राहतील.
२०२४ च्या निवडणुकीत काय होणार याची चिंता भास्कर जाधव यांनी करावी, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिली. माझी चिंता भास्कर जाधव यांनी करू नये, असंही सूचविलं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून कर्नाटकचे मंत्री वाट्टेल ते बोलतात. त्याला प्रत्यूत्तर देणं आवश्यक असल्याचं भास्कर जाधव यांचं म्हणणंय. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, आम्ही वागतो, बोलतो, असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं.