मुंबई : भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील 35 वर्षे जुनी जिलानी बिल्डिंग सोमवारी (21 सप्टेंबर) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 41 जणांचा बळी गेलाय. आज चौथ्या दिवशी या ठिकाणचं बचाव कार्य संपलं (Bhiwandi Building Collapse 38 people died). या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले असून अद्यापही एक 29 वर्षीय महिला आणि अडीच वर्षीय मुलगा बेपत्ता आहे.
एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे बचाव कार्य आज संपले आहे. खरंतर त्यांचं काम बुधवारी सायंकाळी 4 वाजताच थांबवणार होते. परंतु अडीच वर्षीय मुसैफच्या वडिलांनी मुलाला शोधण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा बचावकार्य सुरु करुन आज सकाळी 10 वाजता बचाव कार्य बंद करण्यात आले. सर्व पथके आता माघारी रवाना झाले आहेत.
या दुर्घटनेत अनेक कुटुंबीय उद्ध्वस्त झालेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मोहम्मद शब्बीर कुरेशी यांच्या अडीच वर्षीय मुसैफचा तर मृतदेह देखील अजून सापडला नाही.
दुर्घटना घडली त्यावेळी मोहम्मद शब्बीर याने खिडकीतून उडी मारुन आपली सुटका करुन घेतली. मात्र त्यांची पत्नी परवीन (वय 27) आणि 4 वर्षीय मुलगी मरीयमचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या शोध मोहिमेत त्यांचा मृतदेह हाती लागला. शोध मोहिम थांबवल्यानंतर मोहम्मद शब्बीर हताशपणे ढिगाऱ्याजवळ आपल्या मुसैफच्या मृतदेहाची वाट पाहत बसलेले पाहायला मिळाले.
या दुर्घटनेत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मायलेकींची सुटका करत असताना आई जुलेखा (वय 54) यांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले. परंतु त्यांची मुलगी शबनम मोहम्मद अली शेख (29) हिचा अद्यापही शोध लागलेला नाही. तिची बहीण निलोफर उबेर शेख शबनमचा शोध घेत फिरत आहे. दरम्यान 41 मृतदेहांमध्ये एक 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यासाठी निलोफरने दोन वेळा जाऊन त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो तिचा नसल्याने तिने नारपोली पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार केली आहे. सध्या ती आपली बहीण कशाही अवस्थेत असली तरी आपल्याला मिळावी यासाठी दुर्घटनास्थळावर हताश होऊन बसलीय.
या दुर्घटनेमध्ये तब्बल 22 कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालाय. आता बचाव कार्य थांबवल्यानंतर येथील कुटुंबीय आणि नातेवाईक सर्वच घटनास्थळी आपल्या उद्ध्वस्त संसारातील साहित्याची, मौल्यवान वस्तूंची शोधाशोध करत आहेत.
संबंधित बातम्या :
Bhiwandi building collapse | भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 बळी, अडीच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू
पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला
संबंधित व्हिडीओ :
Bhiwandi Building Collapse 38 people died