भिवंडीत पाच वर्षीय बहिणीवर बलात्कार करुन हत्या, अल्पवयीन आरोपीला दहा हजारांचा दंड
गेल्या वर्षी 28 ऑक्टोबरला भिवंडीतील सारवली गावात राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीची तिच्याच चुलतभावाने बलात्कार करुन हत्या केली होती
मुंबई : मुंबईजवळच्या भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी अल्पवयीन चुलतभावाला केवळ दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली. महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगार न्यायमंडळाने आरोपीला दहा हजारांचा दंड आणि समाजसेवा करण्याचे आदेश (Bhiwandi Girl Rape Murder Cousin Fined) दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 28 ऑक्टोबरला भिवंडीतील सारवली गावातील कोनगाव भागात राहणारी पाच वर्षांची चिमुरडी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना दुसर्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह त्यांना पाण्याच्या पाईपलाईनजवळ सापडला होता.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन तिच्या चुलत भावाला ताब्यात घेण्यात आलं होतं. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात होता.
दिवाळीनिमित्त फटाके नेण्याच्या बहाण्याने आरोपी भाऊ पीडित चिमुरडीला निर्जनस्थळी घेऊन गेला होता. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याने चिमुकलीची हत्या केली होती. आरोपीकडे वडिलांचा स्मार्टफोन सापडला होता. त्यामध्ये असलेल्या अश्लील चित्रफीतींवरुन पोलिसांनी चौकशी केली आणि त्याला अटक झाली.
भिवंडी झोनचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या माहितीनुसार केवळ 50 दिवसांत बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मुख्य न्यायाधीश एच. वाय. कावळे यांनी 13 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला भादंवि कलम 302, 376 आणि 364 आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत दोषी ठरवलं.
आरोपीने घृणास्पद गुन्हा केला आहे. त्याला फक्त दंड लावून सोडलं जाऊ शकत नाही. किशोरवयीन आरोपीला समाजाप्रती आपलं दायित्व लक्षात येण्यासाठी समाजसेवाही करावी लागेल, असे आदेश कोर्टाने (Bhiwandi Girl Rape Murder Cousin Fined) दिले आहेत.