ज्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाला जेरीस आणलं, तोच मुद्दा जरांगे यांनी टाळला; छगन भुजबळ यांनी ठेवलं बोट
Chhagan Bhujbal on Jarange Patil : बीडमधील घेतलेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे यांनी केलेल्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा टाळला, ज्यावरून त्यांनी सरकारची गोची केली. याचाच धागा पकडत भुजबळांनी त्यावर बोट ठेवलं आहे.
मुंबई : मनोज जरांगे यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. मुंबईमधील आझाद मैदानावर आता आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. जरांगे 20 जानेवारीला आमरण उपोषणाला बसणार आहेत. या भाषणामध्ये येवल्याचं येडपट म्हणत जरागेंनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील यांच्या भाषणावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटण्यासाठी गेलं होतं. त्यावेळी जरांगे यांनी आईची जात मुलाला लावावी अशी मागणी केली होती. य मागणीवरून त्यांनी शिष्टमंडळाला जेरीस आणलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. जरांगे यांनी शेवटपर्यंत आईची जात मुलाला लावण्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र आजच्या भाषणामध्ये जरांगेंनी या मुद्द्यावर काहीच भाष्य केलं नाही. याचाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
त्यांचं अर्ध भाषण फक्त भुजबळ यांच्यावरच होतं. नंतरच भाषण लेकरं वगैरे वगैरेवर होतं. भुजबळांवर बोललं नाही, टीका केली नाही तर भाषणात बोलणार काय? मी कालच म्हटलं व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी आज घेतला नाही. काय झालं माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलत असल्याचं म्हणत भुजबळांनी कैचीत पकडलं. यावेळी भुजबळ यांनी बीडमधील झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरूनही टीका केली.
हॉटेल भुजबळ किंवा त्यांच्या माणसांनी जाळलं, असं सुरुवातीला म्हणाले. म्हणे मराठ्यांना डाग लावला. आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरं आणि हॉटेल जाळलं. आता भुजबळांचं नाव घेत आहेत. थोड्यावेळाने म्हणतात, मराठ्याच्या वाट्याला जाऊ नका. बीडला काय होतं ते लक्षात ठेवा, म्हणजे बीडला जे झालं ते तुम्हीच केलं हे सिद्ध होतं ना? तुम्हीच कबूल केलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं आलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, त्यांच्या भाषणात विसंगीत येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी लगावला.