मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बेफाम गाड्या पळणाऱ्यांविरोधात जबर कारवाई, इतक्या जणांचे चलन कापले
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर 8 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. सर्वाधिक कारवाई लेन कटींग आणि ओव्हर स्पीडींग आणि सीट बेल्ट न लावल्या प्रकरणी झाली आहे,
मुंबई : मुंबई – पुणे एक्सप्रेस ( Mumbai-Pune E-Way ) वेवर बेफाम वाहन चालवणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात झालेल्या कारवाईत ओव्हर स्पीडींग प्रकरणी एकूण 2301 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर लेन कटींग प्रकरणी एकूण 1550 चालकांवर कारवाई झाली तर विना सिट बेल्ट ( Seat Belt ) प्रकरणात 1007 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जुना आणि नवीन अशा दोन्ही मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर ही कारवाई करण्यात आली आहे. परीवहन विभागाने ( Transport Department ) नेमलेल्या विशेष पथकाने बेशिस्त वाहन चालकांवर एकूण 10,251 केसेस दाखल केल्या आहेत. या कारवाईचा लगेच रिजल्ट मिळाला आहे. महामार्गावरील देहू रोड ते अमृतांजन टप्प्यातील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटले आहे.
देहू रोड ते अमृतांजन टप्प्यातील अपघात आणि मृत्यू घटले
मुंबई – पुणे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही महामार्गांवरील अपघातांची संख्या त्यामुळे घटली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर 2021 – जानेवारी – 2022 मध्ये नव्या आणि जुन्यावर अनुक्रमे 38 आणि 16 अपघाती मृत्यू झाले होते. यंदाच्या डिसेंबर 2022 – जानेवारी 2023 मध्ये नव्या आणि जुन्या महामार्गांवर अनुक्रमे 14 आणि 6 अशा संख्येत अपघाती मृत्यू घटल्याचे परिवहन उपायुक्त रस्ता ( सुरक्षा कक्ष ) भरत कळसकर यांनी सांगितले.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर वाढते अपघात पाहून परीवहन विभागाने मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बेफाम वाहन चालवणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या कारवाईत ओव्हरस्पीडींगच्या एकूण 2,301 केस , लेन कटींगच्या 1550 केस , सिट बेल्ट न लावल्याच्या 1007 केस , रॉंग साईड पार्कींगच्या 466 केस दाखल झाल्या आहेत. असे एकूण 6,809 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई मध्य आरटीओच्या पथकाने ओव्हर स्पीडींग प्रकरणी एकूण 847 गुन्हे दाखल केले आहे. तर खालोखाल ठाणे- 2 पथकाने ओव्हर स्पाडींग प्रकरणी 838 गुन्हे दाखल केले आहेत.
जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवर ओव्हर स्पीडच्या केवळ 50 केस दाखल झाल्या आहेत. लेन कटींगचे 191 केस, विना सिट बेल्टच्या 446 केस दाखल केले आहेत. जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवर एकूण 3,442 केस परीवहन विभागाने दाखले केले आहे. तर दोन्ही नवा आणि जुना अशा दोन्ही महामार्गांवर झालेल्या कारवाईत ओव्हर स्पीडींगचे एकूण 2351, लेन कटींगच्या 1741 केस , विना सिट बेल्टच्या 1453 केस अशा एकूण दोन्ही नवीन आणि जुना मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मिळून एकूण 10,251 जणांचे चलन कापले गेले आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेस नव्या आणि जुन्या अशा दोन्ही महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे परीवहन विभागाने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुना हायवे दाेन्ही ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांना शिस्त लावण्यासाठी 1 डिसेंबरपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेत 8 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमांर्तगत सहा महिन्यांसाठी ही 24 तास सुरक्षा मोहीम राबविली जाणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांचे (ब्लॅक स्पॉट) सर्व्हेक्षण करणे, उपाय योजना करणे, चालकांसाठी तेथे घडलेल्या अपघातांची माहिती तसेच आकडेवारी दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ही सावधान करणारी सूचना पाहून तरी वाहन चालकांना शिस्त लागावी असा हेतू आहे.
आरटीओच्या इंटरसेप्टर गस्तीवाहनांद्वारे अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, चुकीच्या पद्धतीने लेन कटींग करणाऱ्यांवर कारवाई करणे, विना हेल्मेट तसेच विनासिटबेल्ट प्रवाशांवर कारवाई करणे अशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथके तयार करण्यात आली आहेत.