सांगलीत सर्वात मोठा राजकीय भूंकप, अजितदादा गटात दिग्गज नेते प्रवेश करणार; कोणत्या पक्षाच्या उडाल्या चिरफळ्या
Sangli Ajit Pawar NCP : लोकसभेच्या पराभवातून धडे गिरवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने विधानसभेत मोठी मुसंडी मारली. आता राष्ट्रवादीने पक्ष मजबुतीकडे, संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. सांगलीत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे.

लोकसभेत यश चाखता आले नसले तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीने विधानसभेत झंझावात आणला. सर्व चित्र पालटून टाकले. राष्ट्रवादीने अनेक गड राखले. तर काही ठिकाणी मोठा सुरूंग लावण्यात ते यशस्वी ठरले. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष आणि संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीने जोर दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात राजकीय धक्के बसण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्यात मोठा हादरा देण्यात अजितदादा यशस्वी झाले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागेल आहेत.
सांगलीत दिग्गजांचा राष्ट्रवादीत मेळा
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होईल,अशी चर्चा सुरू झाली आहे. याविषयी एक बैठक देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊस मध्ये अशी बैठक झाल्याचे समोर येत आहे.




काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्रिय
काँग्रेस मधील फूट रोखण्यासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पक्षातंर्गत मोठ्या हालचाली सुरू आहेत. युवक काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. राज्यभरातील जवळपास 90 पदांवरती नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. पुण्यातील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल सुरू आहेत. राहुल शिरसाठ यांची पुन्हा एकदा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर धनदांडगे असणारे सौरभ आमराळे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी बदलाच्या हालचाली सुरू आहेत.