भाजपच्या नगरसेविकेने महापालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या
कल्याण : विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकल्या. प्रमिला श्रीकर चौधरी असं या भाजपच्या महिला नगरसेविकेचं नाव आहे. त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे सतत तक्रार केली. मात्र […]
कल्याण : विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकल्या. प्रमिला श्रीकर चौधरी असं या भाजपच्या महिला नगरसेविकेचं नाव आहे. त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे सतत तक्रार केली. मात्र दोन वर्षे पाठपुरावा करूनही नगररचना विभाग आपल्या तक्रारीवर कारवाई करत नसल्याने महासभेत त्यांनी याप्रकरणी सभा तहकूबी मांडली. त्यावर तासभर चर्चा होऊनही आयुक्त याप्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचे सांगत भाजप नगरसेविका चौधरी आणखीच संतप्त झाल्या. त्यांनी आपली जागा सोडून थेट नगररचना अधिकाऱ्यांसमोर जात आपल्या हातातील बांगड्या त्यांच्यासमोर टेबलावर आदळल्या. यानंतर थेट महापालिका आयुक्तांच्या टेबलसमोर येऊन त्यांनी हातातून आणखी बांगड्या काढल्या आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि पिठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली.
आपली व्यथा प्रमिला चौधरी जेव्हा सभेमध्ये मांडत होत्या त्यावेळी शिवसेना नगरसेविका शालिनी वायले यांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर भावूक होऊन भाजप नगरसेविकेला समर्थन दिले. एकीकडे भाजपकडून घडलेला प्रकार हा चुकीचा आहे असं सांगितलं गेलं. तर दुसरीकडे केडीएमसी महापौर विनिता राणे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांसोबत आयुक्तांची मनधरणी केली आणि परत असा प्रकार होणार नाही असं आश्वासन दिलं.
नगररचना विभागाचे जे अधिकारी सुरेंद्र टेंगळेंमुळे हा सर्व प्रकार झाला असून त्यांची बदली झाली होती, असा आरोप स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केलाय. भाजपच्याच लोकांनी टेंगळे याला परत त्या पदावर आणलं. एकीकडे भाजपची नगरसेविका टेंगळेवर भोंगळ कारभाराचा आरोप करते तर दुसरीकडे भाजपचे लोक त्याला समर्थन करतात. यामुळे भाजपची ही दुटप्पी भूमिका दिसून येत आहे, असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, एका आयएएस अधिकाऱ्यावर बांगड्या फेकल्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत आयुक्तांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
व्हिडीओ पाहा :