किमान पार्टीत नाचू तरी नका…; सरकार सवाल करणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजप नेत्यांनं डिवचलं
Ashish Shelar on Aditya Thackeray : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. वरळी हिट अँड रन केस प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केले होते. त्याला आता आशिष शेलारांनी प्रतित्युत्तर दिलंय. वाचा सविस्तर...
वरळी हिट अँड रन केसमुळे महाराष्ट्र हळहळला आहे. अपघातानंतरही महिलेला फरफटत नेणं मानवी मनाला रूचलेलं नाही. अशातच विरोधकांनी सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं आहे. 60 तास मिहीर राजेश शाहला लपवला. त्याच्या घरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडोझर मुख्यमंत्री चालवणार आहेत का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रश्न विचारला. त्यावर भाजप नेत्याने प्रत्युत्तर दिलंय. फुंकर मारण्याचं दाखवायचं, हे नाटक करू नका. पण किमान पार्टीत नाचू तरी नका, असं आशिष शेलार म्हणालेत.
आशिष शेलार काय म्हणाले?
सरकारनं या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालू नये अशी भाजपची भूमिका आहे. नाखवा कुटुंबियांच्या घरावर कारवाई करा. दु:खी कुटुंबाचं ऐकलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पबवर कारवाई करा असं आम्ही सांगितलं. शाहाचं घर अनधिकृत असेल त्यांच्यावर कारवाई करा. पण किमान पार्टीत नाचू नका. लग्नाच्या पार्टीत नाचू नका. फुंकर मारण्याचं नाटक दाखवायचं हे करू नका, असं आशिष शेलार म्हणाले.
आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरे अजूनही अभ्यासात कच्चे आहेत. आदित्य ठाकरे दोन्हीही बैठकीला आलेले नव्हते. अदित्य ठाकरे कुणाच्या बाजूने आहेत, हे त्यांनी सांगावं. अदित्य ठाकरेंचा असली चेहरा कोणता आहे? अदित्य ठाकरे बालबुद्धीसारखे वागत आहेत, असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मविआवर निशाणा
मराठा आणि ओबीसी समाजासमोर मविआचा खरा चेहरा समोर आलाय. काँग्रेस , राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठानी सर्वपक्षीय बैठकीला पाठ दाखवली. ज्यावेळी निमंत्रण पाठवलं त्यावेळी निमंत्रण पोहोचलं होतं. सर्वपक्षीय बैठकीला पाठ का दाखवली? सर्वपक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं. विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट आधी येणार होती. मग माशी शिंकली कुठे? मेसेज कुणाचा आला आणि निरोप कुठे पोहोचला. आज त्यांचा असली चेहरा समोर आलेला आहे. बालबुद्धीचा प्रश्न आम्हाला विचारत आहेत, असंही आशिष शेलार म्हणाले.