मुंबई: शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हाच धागा पकडत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले. (Ashish Shelar on Shivjayanti 2021 regulations)
आशिष शेलार यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट केले. यामध्ये म्हटले आहे की, भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!”, असे शेलार यांनी म्हटले आहे.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं!
सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!पण खबरदार जर
जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
असे सरकारचे आदेश पण आलेत.त्यामुळे सांभाळा!
अजब वाटले तरी नियम पाळा!!
ठाकरे सरकार करेल,
तेच नियम आणि तेच कायदे!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2021
येत्या 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजंयती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करत राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी गुरुवारी नियमावली जारी केली होती. मात्र, यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारने हे नियम शिथिल केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असं गृहविभागाने परिपत्रकात म्हटलं आहे.
तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
निवडणुका, मेळाव्यांना गर्दी चालते, मग शिवजयंतीला का नाही; मराठा क्रांती मोर्चाचा ठाकरे सरकारला सवाल
सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी
(Ashish Shelar on Shivjayanti 2021 regulations)