तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार कुणी केला, आदित्य ठाकरे यांना या भाजप नेत्याचा सवाल
गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत विविध प्रकारचे टेंडर काढून तीन लाख कोटींचा भ्रष्ट्राचार कुणी केला.
मुंबई – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. टेंडरवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलंय. अमित साटम म्हणाले, गेली ९ महिने स्थायी समितीचा व्यवहार बंद आहे. त्यातून कुणाचीतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातून अशी वक्तव्य केली जात आहेत.
अमित साटम म्हणाले, तुम्ही बदलीबद्दल बोललात. पण, तुम्ही तुमच्या वसुली सरकारमधल्या बदलीबद्दल विसरलात का. तुम्ही अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी पैसे घेतले. त्याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत.
सचिन वाझे कांड विसरलात का, ईडीच्या केसेस विसरलात का, असा सवाल अमित साटम यांनी केला. १०० कोटी रुपयांचा घोटाळा तुमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला, हे तुम्ही विसरलात का. त्यामुळं तुम्हाला बदलीबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत विविध प्रकारचे टेंडर काढून तीन लाख कोटींचा भ्रष्ट्राचार कुणी केला. याचं उत्तर आपण दिलं पाहिजे, असंही अमित साटम यांनी सांगितलं.
रस्त्याच्या पाच हजार कोटींच्या टेंडरबद्दल बोललात. मुंबई शहरातल्या ४२ युटीलीटीजबद्दल बोललात. परंतु, गेल्या २५ वर्षांत वारंवार खोदकाम करण्यात आलं. मुंबईच्या रस्त्यावर युटीलीटी कॉरिडोर का आणला नाहीत.
कोविडच्या काळात तीन हजार कोटीपेक्षा जास्तचे टेंडर कोणत्या नगरसेवकाची परवानगी घेऊन ते टेंडर काढलेत. टेंडर काढून मनाला येईल त्या लोकांना कामं दिलीत.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबई मनपा प्रशासनाला आदेश देण्यात आले. मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय. अटी शर्थींवर कोणतीही कंपनी अद्याप क्वालिफाय झालेली नाही, असंही साटम यांनी सांगितलं. त्यामुळं रिटेंडर काढण्याचे आदेश दिलेले आहेत.