देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान
महायुती सरकारमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा होत आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे विधान केले आहे.
देशातच नाहीतर जगभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे वाजत-गाजत स्वागत झाले. राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच आपल्या घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. आगमन झाल्यावर बाप्पाला भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं साकडं घातलं. आधीच निवडणुकीनंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कोणी घातलं जाणून घ्या.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगलमय वातावरण आहे. वर्षेभर या दिवसाची वाट पाहतो, गणरायाचे आगमन झाले आहेत. गणराय येतानाचे जे दिवस असतात ते भारावलेले असतात. सर्व नातेवाईक एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेला सुखी-समाधानी ठेव, काही ठिकाणी दुष्काळ पडला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. बळीराजा संकटात आहे, महायुती सरकारच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचण्याचं काम झालं आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाचा विकास साधायचा काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
एक व्हिजन असणारे नेते देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. युवक, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असा कोणता घटक नाही, जातीपातीच्या पलीकडे जात काम करणारा आमचा नेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्याच्या अधिकाधिक जागा निवडून येऊ द्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करताना बघण्याची संधी गणरायाने आम्हाला द्यावी. ही इच्छा फक्त माझीच नाहीतर समस्त महाराष्ट्रातील भाजप परिवाराची आहे. हीच इच्छा मी गणरायाकडे मागितली असल्याचं चित्र वाघ म्हणाल्या.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले…
आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.