‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही, चित्रा वाघ यांचा अबू आझमींवर हल्लाबोल
लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. | Chitra wagh Abu Azmi
मुंबई: लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी फटकारले आहे. लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. (BJP leader Chitra wagh criticized Abu Azmi)
लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही
अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते
स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? pic.twitter.com/mWZumninMZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
महिलांना बदनाम करण्याचा राजकीय डाव: तृप्ती देसाई
नेतेमंडळी महिलांना बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. कारण अनेक नेत्यांचे नाव सध्या बलात्कार प्रकरणांमध्ये आल्यामुळे त्यांना वाचविण्याचे काम त्यांचे सहकारी, पक्ष आणि आघाडी करत आहे. महिलाच कशा चुकीच्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यामागे स्वत:ची प्रतिष्ठा वाचवण्याचा राजकीय डाव आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला.
काय म्हणाले होते अबू आझमी?
“देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला.
“एखाद्या महिलेने तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच”
“इस्लामी कायदा आहे. एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. खरं तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत. त्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे. एखाद्या महिलेने तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच. मात्र सत्य काय आहे ते चौकशीअंतीच बाहेर येतं.” याकडे अबू आझमींनी लक्ष वेधलं.
“तक्रारीनंतर लगेच पुरुषाचं नाव मीडियात नको”
“मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथे एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन चालली होती, तरी तिने डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपली संस्कृती आहे. पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये” अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
संबंधित बातम्या:
‘खून, बलात्कार होतातच, गुंड जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढतात, सरकार अस्तित्वहीन झालंय’
(BJP leader Chitra wagh criticized Abu Azmi)