अजित पवारांनी बाता मारु नये, ते एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही : निलेश राणे
माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय.
मुंबई : माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे त्यांना किंमत आहे, असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं. तसेच अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही, असं म्हणत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार 1 वर्षभर शांत का बसले होते, असा सवालही केला (BJP leader Nilesh Rane criticize Ajit Pawar over Election Claim).
निलेश राणे म्हणाले, “अजित पवार यांची स्वतःची ताकद काहीही नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांची आहे. शरद पवार यांनी बारामतीत ताकद निर्माण केली आणि टिकवली. अजूनही शरद पवार यांचं तिथं लहानलहान गोष्टींवर लक्ष असतं, त्यांचा पहारा असतो. अजित पवार यांनी त्यातील काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी निवडून देतो असं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात अजित पवारांमुळे निवडून आला असा एकही आमदार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मोठमोठ्या बाता करु नये.”
“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली.
“अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात”
निलेश राणे म्हणाले, “अजित पवार मागील 1 वर्ष काहीच बोलले नाहीत, आत्ता कुठंतरी बोलायला लागलेत. आघाडी सरकारला 1 वर्ष झाल्यानंतर लोकं मागचं विसरली असं त्यांना वाटत असेल. ते आज दुसऱ्या पक्षातील आमदारांना बोलावत आहेत, पण त्यांना 1 वर्षापूर्वी स्वतःच्या पक्षातील आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार यांचा इतिहास पाहिला तर लोकोपयोगी वास्तू किंवा कार्यक्रम दिसणार नाहीत.”
“भ्रष्टाचाराचे आरोप आणि वेगवेगळी वक्तव्ये यावरच ते चर्चेत असतात. ते समाजोपयोगी कामासाठी चर्चेत नसतात. त्यांना स्वतःच्या पक्षातील आमदार न टिकवता आल्याने तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आजही आठवतात,” असंही राणेनी नमूद केलं.
हेही वाचा :
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
प्रत्येक गोष्टीची जबाबदारी लोकांवर ढकलता, मग ठाकरे सरकार गोट्या खेळायला बसलंय का?: निलेश राणे
संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे
व्हिडीओ पाहा :
BJP leader Nilesh Rane criticize Ajit Pawar over Election Claim