मुख्यमंत्र्यांचं शिक्षण तरी किती? त्यांनी…कुणी केला सवाल? महायुतीत सर्व आलबेल आहे ना?
CM Eknath Shinde : विधानसभेच्या तोंडावर महायुतीमधील लाथाळ्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचं शिक्षण तरी किती? असा बोचरा सवाल विचारण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झालेले असताना आता महायुतीमधील घटक पक्षातील लाथाळ्या पण वाढल्याचे दिसून येत आहे. जागा वाटपावर एकमताचा दावा होत असला तरी एकमेकांना चिमटे काढण्याचा, टोमणे मारण्याचा आणि प्रसंगी हिणवण्याची एकही संधी सोडण्यात येत नसल्याचे दिसून येते. आता थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचं शिक्षण तरी किती? असा बोचरा सवाल विचारण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने राज्यात जोर चढला आहे. त्यातच राज्य सरकारने त्यासाठी समिती स्थापन केल्याने आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. त्यावरून भाजपचे नेते मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकार जितके तेवढेच त्यांनी वापरावे. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे. शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही. धनगर समाजांना शॉर्टकट आरक्षण देण्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहेत. मुख्यमंत्री यांचे शिक्षण किती आहे? अशी सडकून टीका भाजप नेत आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना लक्ष केले.
GR वर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जीआर कसा देऊ शकतात? असा सवाल वळवी यांनी उपस्थित केला. जीआर देणे ही बाब अतिशय गंभीर आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिले जात आहेत, यावर त्यांनी हरकत घेतली.
राजीनामा देता कशाला, येथेच भांडण करा
आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहून सरकारसोबत भांडण केलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे, राजीनामा देण्यासाठी नाही, अशी आठवण वळवी यांनी आदिवासी लोकप्रतिनिधींना करून दिली. तुम्ही आवाज उठवला नाही तर मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील अशा इशारा पद्माकर वळवी यांनी आदिवासी आमदार खासदारांना दिला. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर आता भाजपमधील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिल्याचे समोर येत आहे.