मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मला महाराष्ट्रात राजकारणात रस आहे, असं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय. सुप्रिया सुळे यांनी कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय हा कमिटीत झाला. विमान उशिरा आल्यामुळे हे सर्व झालं. मी अजिबात नाराज नाही”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावर बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, मला वाटते अलीकडच्या काळात संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसते. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांच्यात जनाधार असलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख आहे.
शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांच्याकडे पाहिलं जातं. सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून झालेलं काम पाहिले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी अजित पवार यांची ओळख आहे. मागे दोन तीन घटनांत अजित पवार यांना त्यांची जागा दाखवली असं म्हटलं तर त्यांना आवडणार नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. वारंवार अजित पवार यांचा अपमान होत आहे. तसा संदेश देण्याचा प्रयत्न आहे असे वाटत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना देशाचं नेतृत्व दिलं हे ठिक आहे. पण, राज्याचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांना दिले. यातून संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं वाटत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. उद्या असंही सांगितलं जाईल की, अजित पवार यांनी सुचवलं. त्यांनी ठराव मांडला. आम्ही चर्चा करून ठरवलं, असं भुजबळ म्हणाले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष करा, असं म्हटलं होतं, याची आठवण प्रवीण दरेकर यांनी करून दिली.
अजित पवार यांनी योग्य भूमिका घेण्याची गरज आहे. अजित पवार यांच्यावर अन्याय होतो. ज्या ज्या नियुक्त्या होतात त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. भूकंपाचं केंद्रबिंदू अजित पवार आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर ते सांगू शकतील, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं.