ST च्या विलिनीकरणाचा प्रश्न दिवाकर रावतेंना विचारा, सुधीर मुनगंटीवार यांचं परिवहन मंत्र्यांना प्रत्युत्तर
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज सुधीर मुनंगटीवार यांच्या काळात एसटीचं विलिनीकरण का केलं नाही, असा सवाल केला होता. परब यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज सुधीर मुनंगटीवार यांच्या काळात एसटीचं विलिनीकरण का केलं नाही, असा सवाल केला होता. परब यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. हा प्रश्न मला विचारण्याऐवजी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवा, त्यावेळी त्यांच्याकडे हे खाते होते, असं मुनंगटीवार म्हणाले आहेत.
बारा महिने झोपा काढता का?
एसटीचा प्रश्न मार्गी लावायचा असता तर त्यांनी मार्गी लावला असता असा प्रस्ताव त्या वेळी एसटी विभागाच्या माध्यमातून टाकला होता का?, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीपूर्वी जारी केलेल्या शपथनामामध्ये जे सांगितलं ते इतकं केलं तरी बास होईल. सत्तेचा माज आला असं वागू नका चर्चा करा, एसटी कर्मचारीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत, असा इशारा मुनंगटीवार यांनी दिला. अनिल परब यांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत.कुंभकर्ण सहा महिने झोपत होता तुम्ही बारा महिने झोपतात का, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.
प्रकरण कोर्टात असलं तरी चर्चा करु शकता
पगारवाढीची मागणी सोडून सर्व मागण्या मान्य केल्यात. उरलेल्या मागण्यांबद्दल चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल असं अनिल परब म्हणालेत. संप कोर्टानं बेकायदेशी असल्याचं देखील ते म्हणालेत. हायकोर्टात जनतेच्या कराच्या पैशातून वकील करायचा आणि जनतेला कोर्टात टाकायचं हे चुकीच आहे. हायकोर्टाने जरी सांगितलं असलं तरी तुम्ही आज चर्चा करू शकता, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना प्रेमानं साद घाला
हायकोर्टाने बारा आठवड्यात प्रश्न सोडवायला सांगितलेला आहे. म्हणून 12 आठवडे वाट पाहायची असं गरजेच आहे का? तुम्ही कर्मचारी बांधवांना विश्वास द्या त्यांना प्रेमाने साद घाला ते कर्मचारी तुमच्यासोबत आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही निलंबित करु अशी धमकी देता. याद राखा एक दिवशी ही जनता तुमच्या सरकारला 1000 वर्षासाठी निलंबित करेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
बनावट कागदपत्रांवर बारा कोटींचे कर्ज, लातूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होणार!
उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवलेला नाही, गुणरत्न सदावर्तेंचं अनिल परब यांना चॅलेंज