‘भाजपने राम कदम यांना एकटे पाडलेय’
मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या […]
मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या आमदार राम कदम आणि इतर भाजप नेत्यांचा समाचार घेतला. (Pratap sarnaik slams Ram Kadam)
प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, भाजपचे प्रवक्ते राम कदम यांना त्यांच्याच पक्षाने एकटे पाडले आहे. सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली होती, असा अहवाल ‘एम्स’ने दिल्यानंतर आता सगळे टीकाकार कुठे गेले? तसेच गुप्तेश्वर पांडे नावाचा अधिकारी कुठे गेला?, असा सवाल सरनाईक यांनी विचारला. गुप्तेश्वर पांडे बिहारमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, ‘एम्स’च्या अहवालामुळे ते ‘उघडेश्वर पांडे’ झाले आहेत, अशी टीकाही प्रताप सरनाईक यांनी केली.
तसेच यावेळी प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सुशांत सिंह याचे कुठल्या कलाकारांसोबत संबंध होते, याची माहिती मुंबई पोलिसांनाही होती. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट गोष्टी सांगायच्या नसतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये भाजप आमदार राम कदम आघाडीवर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. भाजप नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात आला होता. हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का होता. परंतु, आता सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली, असा अहवाल दिल्यामुळे महाविकासआघाडीवर टीका करणारे नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
संबंधित बातम्या:
सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी
(Pratap sarnaik slams Ram Kadam)